अमरावतीला लाभल्या तडफदार पहिल्या महिला पोलिस आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aarati sing.

डॉ. आरती सिंग या २००६ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. चांगल्या सेवेबद्दल केंद्र शासनाकडून त्यांना आंतरिक सुरक्षा पदक, राज्य शासनाकडून विशेष सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

अमरावतीला लाभल्या तडफदार पहिल्या महिला पोलिस आयुक्त

अमरावती : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून चंद्रकिशोर मिना आणि अमरावतीच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त म्हणून डॉ. आरती सिंह यांनी आज पदभार स्वीकारला. श्री. मिना आणि डॉ. सिंह पती-पत्नी आहेत. जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त डॉ. सिंह यांनी सांगितले. तर परिक्षेत्रात भ्रष्टाचाराचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे चंद्रकिशोर मिना यांनी सांगितले.

आयपीएस अधिकारी म्हणून सेवाकाळातील जवळपास नऊ वर्षे विदर्भात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे येथील भौगोलिक परिस्थितीची जाणीव आहे. अमरावती शहरात काम करताना जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न राहील, असे आयुक्त डॉ. सिंग आज म्हणाल्या. मावळते पोलिस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एम.बी.बी.एस. पर्यंत शिक्षण घेतल्यावर डॉ. आरती सिंग यांनी एम. डी. करण्यासाठी प्रवेश घेतला होता. मात्र वैद्यकीय सेवा करताना तळागाळातील महिलांसमोरच्या प्रश्नांची जाणीव झाली आणि पोलिस खात्यात येण्याचे ठरविले, असे डॉ. आरती सिंग यांनी सांगितले.

डॉ. आरती सिंग या २००६ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. चांगल्या सेवेबद्दल केंद्र शासनाकडून त्यांना आंतरिक सुरक्षा पदक, राज्य शासनाकडून विशेष सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सामान्य नागरिक, महिलांची सुरक्षा, अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील. तसेच त्यापूर्वी शहराची पाहणी केली जाईल आणि अधिका-यांची बैठक घेऊन माहिती घेतली जाईल. असे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी सांगितले.

विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना म्हणाले, पोलिस हे शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते. त्यामुळे परिक्षेत्रात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. अशा गोष्टींचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली.

सविस्तर वाचा - कंगना प्रकरणी काय म्हणाल्या संतापलेल्या नवनीत राणा?

ते २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गडचिरोली, गोंदिया, अकोला, नांदेड, मुंबईमध्ये त्यांची आतापर्यंत सेवा झाली. येता काळ, राष्ट्रीय सण आणि सार्वजनिक उत्सवाचा आहे. शिवाय परिक्षेत्राच्या जिल्ह्यातील काही भाग संवेदनशील म्हणून गणला जातो. त्यामुळे सार्वजनिक उत्सव काळात कायदा, सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी आवश्यकता भासेल तेव्हा जनतेची मदत घेतली जाईल. अकोल्यातील कामाचा अनुभव आहे. त्यामुळे परिक्षेत्राची जबाबदारी वेगळी आहे. पोलिस अधीक्षकांची बैठक घेऊन माहिती घेतली जाईल. गुन्हेगारांवर अंकुश, अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलिसांनी त्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यादृष्टीने भविष्यात सुद्धा प्रयत्न होईल. असे श्री. मिना यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

Web Title: Aarati Sing New Commissioner Police Amaravati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravati