महागावातील एसीबीच्या कारवाईनं नगरपंचायत वर्तुळात खळबळ; लेखापाल, कनिष्ठ लिपिक जाळ्यात 

विनोद कोपरकर 
Wednesday, 20 January 2021

मनोज भालेराव (पद लेखापाल, वर्ग-3), शेख मोसीन शेख मोहम्मद, (पद कनिष्ठ लिपिक), अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार हे कंत्राटदार असून, त्यांनी महागाव येथील प्रभाग क्रमांक 11 व 16 येथील विंधन विहिरीवर मोटार पंप व इतर साहित्य बसविले होते.

महागाव (जि. यवतमाळ.) :  कंत्राटदार असलेल्या व्यक्तीला साहित्याचे देयक मंजूर करून देण्यासाठी पाच हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज केलेल्या कारवाईत नगरपंचायतमध्ये कार्यरत लेखापाल व कनिष्ठ लिपिक लाच स्वीकारताना अडकले. त्यामुळे नगरपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली.

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

मनोज भालेराव (पद लेखापाल, वर्ग-3), शेख मोसीन शेख मोहम्मद, (पद कनिष्ठ लिपिक), अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार हे कंत्राटदार असून, त्यांनी महागाव येथील प्रभाग क्रमांक 11 व 16 येथील विंधन विहिरीवर मोटार पंप व इतर साहित्य बसविले होते. साहित्याचे देयक मंजूर करून देण्यासाठी मनोज भालेराव व शेख मोसीन यांनी लाचेची मागणी केली. 

पडताळणीदरम्यान तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. बुधवारी (ता.20) नगर पंचायत कार्यालय परिसरात असलेल्या हॉटेलजवळ शेख मोसीन याने स्वत:सह लेखापाल भालेरावसाठी पाच हजाराची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, पोलिस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, अनिल राजकुमार, वसीम शेख, विजय अजमिरे, राकेश सावसाकडे, महेश वाकोडे, राहुल गेडाम, संजय कांबळे यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB caught two officers doing corruption in Yavatmal district