दारू तस्करांनी काढला पळ; झाला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

कार चालक पोलिसांना पाहून पाळण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची कार झाडावर आदळली. त्यात आरोपींना किरकोळ जखमी झाले.  कारमधून तब्बल 400 लीटर मोहफुलाची दारू जप्त केली आहे.

पाटणसावंगी, (जि. नागपूर) : दारूची वाहतूक करताना पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. तर पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधून तब्बल 400 लीटर मोहफुलाची दारू जप्त केली आहे. ही घटना नजीकच्या इटनगोटी येथे घडली. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत मोहफुलाची दारू जप्त केली. पोलिसांनी हातभट्टीच्या दारूसह सुमारे 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास पाटणसावंगी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना धापेवाडा-पाटणसावंगी मार्गावरील इटनगोटी गावाजवळ मोहफुलाच्या दारू ची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी वाहनांची झाडाझडती घेतली. यातील एक कार चालक पोलिसांना पाहून पाळण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची कार झाडावर आदळली. त्यात आरोपींना किरकोळ जखमी झाले.

टायर ट्युबमध्ये मोहफुलाची दारू आढळली

अपघातग्रस्त कारची चौकशी केल्यावर त्यात टायर ट्युबमध्ये मोहफुलाची दारू आढळली. या प्रकरणी आरोपी अविनाश पवार (वय 28, रा. तिडंगी), विक्की चंद्रिकापुरे (वय 30), सुनील धुर्वे (वय 22 दोघेही रा. पिपळा डा.ब) यांना अटक केली. त्याच्याजवळची कार जप्त केली. पोलिसांनी 400 लिटर मोहफुलाची दारू (किंमत 40 हजार रुपये) ताब्यात घेतली. आरोपींची चौकशीत ही दारू चारचाकीने आरोपींनी तिडंगी येथून आणला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आरोपी सावनेर पोलिसांच्या स्वाधीन

या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिन्ही आरोपींना सावनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई कृष्णा जुनघरे, देवेंद्र रडके, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, नरेंद्र गौरखेडे, बाबा केचे, चंद्रशेखर घडेकर, विनीत गायधने यांच्या पथकाने केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of Alcohol transporters near Patanasangi