अरेरे! दहावीचा पेपर सोडवून दोघेही बहीण-भाऊ घरी येत होते, अन्‌ अचानक.... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

पेपर झाल्यानंतर राधिकाने दुचाकी चालविण्यासाठी हाती घेतली. तिच्या मागे रौनक बसला होता. भरधाव दुचाकी काही अंतर गेल्यानंतर रस्त्यातील गतिरोधकावरून ती उसळली आणि अनियंत्रित झाली. यात दुचाकीच्या मागे बसलेला रौनक भर रस्त्यात फेकला गेला. 

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : दहावीचा पेपर देण्यासाठी गेलेल्या बहिणीला घेण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, तर बहीण गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी, 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पडोली चौकात घडली. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रौनक बहादूर सिंग (वय 18) असे मृत भावाचे, तर राधिका बहादूर सिंग (वय 16) जखमी बहिणीचे नाव आहे. 

राधिका बहादूर सिंग हिची दहावीची परीक्षा सुरू आहे. पडोली चौकातील नारायणा विद्यालयात बुधवारी ती पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर झाल्यानंतर तिला घेण्यासाठी मोठा भाऊ रौनक हा एमएच 12 सीझेड 4419 क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता. पेपर झाल्यानंतर राधिकाने दुचाकी चालविण्यासाठी हाती घेतली. तिच्या मागे रौनक बसला होता. भरधाव दुचाकी काही अंतर गेल्यानंतर रस्त्यातील गतिरोधकावरून ती उसळली आणि अनियंत्रित झाली. यात दुचाकीच्या मागे बसलेला रौनक भर रस्त्यात फेकला गेला. 

अवश्य वाचा- मुख्याध्यापक गेले मित्राच्या पार्टीला, अन् घडले हे...

रौनक ट्रकच्या चाकाखाली आला

याचवेळी त्या मार्गाने एमएच 34 एव्ही 3120 क्रमांकाचा ट्रक भरधाव येत होता. काही कळण्याच्या आदीच ट्रकचे चाक रौनकच्या अंगावरून गेले आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर राधिका गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. जखमी राधिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी ट्रकचालक श्रीधर कोळमकर (रा. सास्ती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in Chandrapur. Brother dead, Sister Injured