esakal | भीषण! चालकाची एक चूक आणि थेट हनुमान मंदिरावर धडकली वरातीची बस; मध्यरात्रीचा धडकी भरवणारा थरार 
sakal

बोलून बातमी शोधा

accident of private bus near Bhandara district one no more

गोंदिया जिल्ह्यातील किरणापूर येथे रविवारी सायंकाळी लग्नसमारंभासाठी नागपूरवरून खासगी बसद्वारे करात गेली होती. लग्न समारंभ व जेवण झाल्यानंतर रात्री वऱ्हाडी बसद्वारे नागपूरला जाण्यास निघाले.

भीषण! चालकाची एक चूक आणि थेट हनुमान मंदिरावर धडकली वरातीची बस; मध्यरात्रीचा धडकी भरवणारा थरार 

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

लाखनी (जि. भंडारा) : लग्नाच्या वऱ्हाड्यांना घेऊन नागपूरला जाणाऱ्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरावर धडकली. यामुळे बसमधील एकाचा मृत्यू झाला तर, 24 जण जखमी झाले. मृताचे नाव प्रशांत गायकवाड (वय 52, नागपूर) असून हा अपघात शनिवारी मध्यरात्री पिंपळगाव (सडक) येथे झाला. लाखनी येथील प्राथमिक उपचार केल्यावर सर्व जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील किरणापूर येथे रविवारी सायंकाळी लग्नसमारंभासाठी नागपूरवरून खासगी बसद्वारे करात गेली होती. लग्न समारंभ व जेवण झाल्यानंतर रात्री वऱ्हाडी बसद्वारे नागपूरला जाण्यास निघाले. साकोलीवरून लाखनीकडे येत असताना मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील बसवरील चालकाचे  नियंत्रण सुटले. त्यामुळे पिंपळगाव (सडक) येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराला बसने धडक दिली. यात मंदिराच्या एका बाजूची भिंत कोसळली असून, समोरील फाटक व ओट्याचे नुकसान झाले.

हेही वाचा - सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं उचललं टोकाचं...

या अपघातात बसचा समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातात बसमधील सुमारे 24 जणांना दुखापत झाली. तसेच अधिक जखमी झाल्याने प्रशांत गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला. पिंपळगाव येथील पोलिस पाटील सुरेश मते यांनी लाखनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी बसमधील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांनी बस चालक विलास दौलत डोंगरे रा. वाठोडा, नागपूर याला ताब्यात घेतले.

रुग्णालयात कर्मचाऱ्यांची धावपळ

ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या वेळी अचानक मोठ्या प्रमाणात जखमींना आणण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी सर्व जखमींवर प्रथमोपचार सुरू केले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. यात सुरेश गायकवाड (वय 49), अनुप मेंढे (वय 59),राजन लांजेवार (वय 41), प्रवीण गायकवाड (वय 45), अजय जीवने (वय 43) आणि वांशिका निकोसे (वय 15) यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७...

इतर 18 जण किरकोळ जखमी असल्याने त्यांना प्रथमोपचारानंतर सुटी देण्यात आली. त्यात लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. यातील सर्व जखमी नागपूरचे असल्यामुळे त्यांनी भंडारा ऐवजी नागपूरला जाण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे जखमींना नागपूर येथील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. लाखनी पोलिसांनी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक घरडे तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ