अहवाल धडकला  : या शहरातील "त्या' दोन्ही मृत महिला कोरोनाबाधित; कुटुंबातील 19 जण क्वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

कमेला ग्राउंड येथील 70 वर्षीय महिला घरीच मरण पावली होती, तर हैदरपुरा येथील 60 वर्षीय महिलेवर महेंद्र कॉलनीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन्ही महिलांच्या मृत्यूपश्‍चात घेण्यात आलेले नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत.

अमरावती : स्थानिक हैदरपुरा आणि कमेला ग्राऊंड येथे 20 एप्रिल रोजी मरण पावलेल्या दोन्ही महिला कोरोनाबाधित असल्याचे बुधवारी (ता.22) रात्री धडकलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यावरून दोन्ही कुटुंबातील 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कमेला ग्राउंड येथील 70 वर्षीय महिला घरीच मरण पावली होती, तर हैदरपुरा येथील 60 वर्षीय महिलेवर महेंद्र कॉलनीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन्ही महिलांच्या मृत्यूपश्‍चात घेण्यात आलेले नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. दोन्ही महिलांच्या कुटुंबातील 34 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. पैकी दोन नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर हैदरपुरा येथून 12 तर कमेला ग्राउंड येथील महिलेच्या 7 नातेवाइकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईनच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वर्तविली. 

जिल्हाधिकारी नवाल यांचे नागरिकांना आवाहन

शहराची लोकसंख्या अंदाजे 8.50 लाखांच्या घरात आहे. त्यादृष्टीने प्रत्येक घरात जाऊन स्वॅब नमुने घेणे शक्‍य नाही. आरोग्य विभागातर्फे घरोघरी कंटोन्मेंट क्षेत्रात प्राधान्याने सर्वेक्षण केले जात आहे. कंटोन्मेंट क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी लगतच्या नागरी रुग्णालयात स्वॅब घेण्याची व्यवस्था अस्तित्त्वात आणली जाऊ शकते. सर्दी, ताप, खोकल्याशी संबंधित व्यक्तींनी कोणताही संकोच न ठेवता रुग्णालयात स्वतः येऊन तपासणी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केले आहे. 

अवश्य पहा- Video : पांढऱ्या सोन्याची होतेय बेभाव विक्री, शेतकरी आर्थिक संकटात!

डॉक्‍टरला बजावली नोटीस 

हैदरपुरा येथील मरण पावलेल्या 60 वर्षीय महिलेवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिली की नाही, याचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र, संबंधित डॉक्‍टरांना महापालिकेने नोटीस बजावली असून 14 दिवस रुग्णालय बंद ठेवण्यास सांगितले आहे. 

आणखी दोघांचा मृत्यू 

शहरातील कंटोन्मेंट क्षेत्रालगतच्या तारखेडा येथे एका 40 वर्षीय महिलेचा, तर रजानगर येथील 30 वर्षीय तरुणाचा बुधवारी (ता.22) मृत्यू झाला. त्यापैकी महिलेला मधुमेह व लठ्ठपणाचा आजार होता, तर रजानगरातील युवकाला व्यसन होते, अशी प्राथमिक माहिती आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to report Both dead women were corona infected in Amravati city