शिकार प्रकरणातील आरोपी नातेवाईकांसह पसार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

काही दिवसांपूर्वी आयुध निर्माणी परिसरात दोन बिबट, दोन अस्वल आणि एक हरीण मृत आढळून आले होते. या प्राण्यांना शिकारीसाठी जिवंत विद्युत तारा लावून मारण्यात आल्याची शंका वनविभागाला आहे. या घटनेचा तपास वनविभाग करीत आहेत.

भद्रावती(चंद्रपूर) : आयुध निर्माणी परिसरात काही दिवसांपूर्वीच बिबट, अस्वल आणि हरीण मृतावस्थेत आढळून आले होते. याचा तपास वनविभागाने सुरू केला आहे. याप्रकरणात एका संशयितास वनविभागाने ताब्यात घेतले. मात्र, संशयिताच्या नातेवाइकाने वनविभागाच्या कार्यालयातच गोंधळ घातला. वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांना ओढाताण करून आरोपीला पळून जाण्यास मदत केली.

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?
ही घटना शनिवारी (ता. 8) सायंकाळच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात घडली. विनोद सदवत चेट्टी राहणार पिरबोडी असे या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संशयित आरोपी, त्याला पळविणारे नातेवाईक सध्या पसार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी आयुध निर्माणी परिसरात दोन बिबट, दोन अस्वल आणि एक हरीण मृत आढळून आले होते. या प्राण्यांना शिकारीसाठी जिवंत विद्युत तारा लावून मारण्यात आल्याची शंका वनविभागाला आहे. या घटनेचा तपास वनविभाग करीत आहेत. आतापर्यंत चौकशीसाठी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी एकला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. उर्वरित तिघांना सोडण्यात आले होते. त्यानंतर विनोद चेट्टी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याच्या नातेवाईकांनी वनकार्यालयात गोंधळ घालीत वनअधिकाऱ्यांस ओढातान करून संशयित आरोपीला पळवून नेले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused in hunt case run away

टॅग्स
टॉपिकस