महिला वनअधिकाऱ्याला धक्काबुक्की करून आरोपीला पळविले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

संशयिताच्या नातेवाइकाने वनविभागाच्या कार्यालयातच गोंधळ घातला. वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांना ओढाताण करून आरोपीला पळून जाण्यास मदत केली. 

भद्रावती (चंद्रपूर) : आयुध निर्माणी परिसरात काही दिवसांपूर्वीच बिबट, अस्वल आणि हरीण मृतावस्थेत आढळून आले होते. याचा तपास वनविभागाने सुरू केला आहे. या प्रकरणात एका संशयितास वनविभागाने ताब्यात घेतले. मात्र, संशयिताच्या नातेवाइकाने वनविभागाच्या कार्यालयातच गोंधळ घातला. वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांना ओढाताण करून आरोपीला पळून जाण्यास मदत केली. 

तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून मारल्याचा संशय

ही घटना शनिवारी (ता. 8) सायंकाळच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात घडली. विनोद सदवत चेट्टी (रा. पिरबोडी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संशयित आरोपी आणि त्याला पळविणारे नातेवाईक सध्या पसार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी आयुध निर्माणी परिसरात दोन बिबट, दोन अस्वल आणि एक हरीण मृत आढळून आले होते. या प्राण्यांना शिकारीसाठी तारांमध्ये जिवंत विद्युत सोडून मारण्यात आल्याची शंका वनविभागाला आहे. 

 

अवश्‍य वाचा- हिंगणघाटच्या "त्या' दुर्दैवी घटनेतील मृत अंकितावर अंत्यसंस्कार 

 

चौकशीसाठी चौघे ताब्यात

या घटनेचा तपास वनविभाग करीत आहेत. आतापर्यंत चौकशीसाठी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी एकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. उर्वरित तिघांना सोडण्यात आले होते. त्यानंतर विनोद चेट्टी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याच्या नातेवाईकांनी वनकार्यालयात गोंधळ घालीत वनअधिकाऱ्यांसोबत ओढाताण करून संशयित आरोपीला पळवून नेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused ran away by beating a woman forest officer

टॅग्स
टॉपिकस