'ती' गावात आली अन्‌ होत्याचे नव्हते झाले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

पीडित तरुणीसोबत गोंदिया येथे शिकणाऱ्या गंगाझरी येथील राहुल नान्हे याने एकतर्फी प्रेमातून सोबती खुमेंद्र जगणित याच्यासोबत दुचाकीने जाऊन ऍसिड हल्ला केल्याचे समोर आले. दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.

गोंदिया : गाव गोंदिया तालुक्‍यातील खळबंदा... येथील एक तरुणी नागपुरातील प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेते... कधीकधी गावाला जायची... मात्र, सध्या सुट्या असल्याने ती गावातच राहत होती. सर्व काही सुरळीत सुरू होते... बॅंकेचे काम असल्याने ती घराबाहेर पडली... एमआयडीसी मुंडीपार येथे आली असताना बसस्थानकाजवळ उभी होती... दरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोघांनी होत्याचे नव्हत केले.... 

गोंदिया तालुक्‍यातील खळबंदा येथील तरुणी ही नागपूर येथील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सुट्या असल्याने ती गावाला आली होती. बुधवारी (ता. 18) बॅंकेच्या कामानिमित्त तालुक्‍यातील एमआयडीसी मुंडीपार येथे आली असताना बसस्थानकाजवळ उभी होती. या दरम्यान राहुल नान्हे (वय 24, रा. गंगाझरी) व खुमेंद्र जगणित (वय 24, रा. धामनेवाडा) हे तरुण काळ्या रंगाच्या होंडा शाइन दुचाकीने तोंडाला कापड बांधून व हेल्मेट घालून आले अन्‌ तिच्यावर ऍसिड हल्ला केला. त्यानंतर दोघेही गंगाझरीच्या दिशेने पळाले. 

हेही वाचा - प्रियकराचा झाला अपमान; प्रेयसीने काढला चाकू 

घटनेची माहिती होताच पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, स्थानिक गुन्हे शाखा व गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास कार्याला सुरुवात केली. यासाठी चार पथके गठित केले. त्यानंतर रुग्णालयात भरती जखमी तरुणीला विचारणा केली असता एकतर्फी प्रेमप्रकरणातून हल्ला झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. त्या अनुषंगाने तपासपथकाने तपास केला. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

क्लिक करा - बापरे! येथे महिन्याला होतात सात खून

या कारवाईत गंगाझरीचे पोलिस निरीक्षक राहुल शिरे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, प्रदीप अतुलकर, गणेश धुमाळ, उरकुडे, पोलिस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलिस कर्मचारी लीलेंद्र बैस, विजय रहागंडाले, चंद्रकांत कर्पे, गोपाल कापगते, भुवनलाल देशमुख, कोडापे, दीक्षितकुमार दमाहे, धनंजय शेंडे, प्रभाकर पालांदूरकर, विनोद बैरय्या, संजय मारवाडे, विनय शेंडे, रेखलाल गौतम, नेवालाल भेलावे, अजय रहागंडाले, शेंदरे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 

सविस्तर वाचा - चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

26 पर्यंत पोलिस कोठडी

पीडित तरुणीसोबत गोंदिया येथे शिकणाऱ्या गंगाझरी येथील राहुल नान्हे याने एकतर्फी प्रेमातून सोबती खुमेंद्र जगणित याच्यासोबत दुचाकीने जाऊन ऍसिड हल्ला केल्याचे समोर आले. दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 26 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid attack on girl in Gondia