बापरे! येथे महिन्याला होतात सात खून

अनिल कांबळे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि गुन्हे शाखा प्रयत्नरत आहेत. महिला सुरक्षेसाठी पोलिसांचे अनेक उपक्रम सुरू असतानासुद्धा महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचारी गस्त किंवा सुरक्षेच्या नावावर खानापूर्ती करीत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे. 

नागपूर : उपराजधानीची "क्राईम कॅपिटल' अशी ओळख निर्माण होत असून, 11 महिन्यांत 82 जणांचा खून तर 72 जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक महिन्यात सरासरी सात जणांचा खून झाला आहे. शहरात हत्याकांडाच्या मालिका सुरू असून, 2019 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तीन हत्याकांड उपराजधानीत घडले होते.

उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि गुन्हे शाखा प्रयत्नरत आहेत. मात्र, पोलिस ठाण्यातील कर्मचारी गस्त किंवा सुरक्षेच्या नावावर खानापूर्ती करीत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे. उपराजधानीतील झोपडपट्ट्याबहुल वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या टोळ्यांवर तत्कालीन पोलिस आयुक्‍त शारदाप्रसाद यादव यांनी अंकुश ठेवला होता. मात्र, त्यानंतर अनेक वस्त्यांतून पुन्हा एकदा या गॅंग सक्रिय झाल्या आणि गॅंगवॉरमधून हत्याकांडही घडले.

 

अधिक माहितीसाठी - कॉपर सलूनच्या उभारणीत डॉन आंबेकरचा पैसा!

 

2019च्या एक जानेवारीला एकाच दिवशी शहरात तीन जणांचा खून झाला होता. त्यानंतर मागील 11 महिन्यांत 82 जणांचा खून झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात सरासरी सात जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय तब्बल 82 जणांवर धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. या आकडेवारीवरून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

असे का घडले? - 'पत्नी और वो'चा फेरा अन्‌ त्याने कवटाळले मृत्यूला

 

महिलांबाबतच्या गुन्ह्यात वाढ

नागपूर पोलिसांचा महिला सुरक्षेचा दावा फोल ठरला आहे. महिला सुरक्षेसाठी पोलिसांचे अनेक उपक्रम सुरू असतानासुद्धा महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. वर्षभरात 151 युवती व महिलांवर बलात्कार झाले तर 299 महिला-तरुणींशी अश्‍लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासोबत घरगुती हिंसाचार आणि महिलांवरील हल्ले, मारहाण आणि कौटुंबिक छळाच्या घटना 123 पर्यंत पोहोचल्या आहेत. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, पोलिसांनी महिला सुरक्षेवर भर देण्याची गरज आहे.

क्षणिक रागातून झालेल्या खुनांचा आकडा मोठा
हत्याकांडांचा आकडा जरी 82 असला तरी त्यामध्ये कौटुंबिक कारणांतून किंवा क्षणिक रागातून झालेल्या खुनांचा मोठा आकडा आहे. शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्या जवळपास संपल्या आहेत. सुमित ठाकूर, चिंतलवार, रोशन, लिटील सरदार, शेखू, नव्वा अशा गुंडांना सध्या मध्यवती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. संतोष आंबेकरसारख्या गुंडाची दहशत संपविली आहे. गुन्हे शाखेने आतापर्यंत गुन्हेगारांवर अंकुश ठेवल्यामुळे कायदा व सुरक्षा कायम आहे.
- नीलेश भरणे,
अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा.

आकडे बोलतात

  • गेल्या 11 महिन्यांत 82 खून
  • 82 जणांवर धादार शस्त्राने हल्ला
  • 151 महिलांवर बलात्कार
  • 299 महिलांशी अश्‍लील चाळे
  • कौटुंबिक छळाच्या घटना 123

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur become a crime capital