esakal | पाचशेवर वाहनचालकांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

पाचशेवर वाहनचालकांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः केंद्र सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दहापट दंड वाढविल्यामुळे रविवारी शहरात वाहनचालकांमध्ये धाकधूक होती. हा नियम लागू झाल्यानंतर वाहतूक पोलिसही सकाळपासून कारवाईसाठी उभे होते. दिवसभरात पोलिसांनी पाचशेपेक्षा जास्त वाहनाचालकांवर कारवाई करीत दीड लाखाचा दंड वसूल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतुकीच्या नवीन नियमांनुसार रविवारपासून दहापट दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली होती. त्यामुळे उपराजधानीतील वाहनचालकांनी सतर्कता बाळगली. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम राबविली. अजनीमध्ये 15, कॉटन मार्केटमध्ये 60, इंदोरामध्ये 80, कामठीमध्ये 70, लकडगंजमध्ये 60, एमआयडीसीमध्ये शंभर, सदरमध्ये 22, सक्‍करदरामध्ये 23, सीताबर्डीत 60 आणि सोनेगावमध्ये 35 वाहनचालकांवर दुपारपर्यंत कारवाई केली.
अद्यापपर्यंत केंद्र सरकारचे कोणतेही नोटिफिकेशन प्राप्त झाले नाही. त्यामुळे जुन्या नियमांनुसारच कारवाई करण्यात आली. नोटिफिकेशन प्राप्त होताच नवीन नियमावलीनुसार दंड आकारण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. जुन्या नियमांनुसारच दंड आकारल्याने अनेक वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला, हे विशेष.

भ्रष्टाचाराला मिळेल वाव
वाहतुकीच्या नवीन नियमांनुसार दंडामध्ये दहापट वाढ करण्यात आली. त्यामुळे दहा हजार रुपये दंड भरण्यापेक्षा वाहनचालक 4 ते 5 हजार रुपये वाहतूक शिपायाला देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणार. दंडाची अव्वाच्यासव्वा रकमेमुळे वाहनचालकही दंड भरण्यापेक्षा पोलिसांना लाच देण्यावर भर देऊ शकतात. नवीन नियमांमुळे पोलिस विभागात पुन्हा भ्रष्टाचार वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

loading image
go to top