बोर अभयारण्याचे अडेगाव प्रवेशद्वार "कुलूपबंद' :पावसामुळे पर्यटनाला ब्रेक;

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 October 2019

हिंगणा (जि.नागपूर) : दिवाळीच्या सुट्टीत बोर अभयारण्यात पर्यटकांची वर्दळ असते. यावर्षी सुरू असलेल्या पावसामुळे अभयारण्यातील पर्यटनाचे रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत. यामुळे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे दिवाळीत पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 

हिंगणा (जि.नागपूर) : दिवाळीच्या सुट्टीत बोर अभयारण्यात पर्यटकांची वर्दळ असते. यावर्षी सुरू असलेल्या पावसामुळे अभयारण्यातील पर्यटनाचे रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत. यामुळे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे दिवाळीत पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 
नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बोर अभयारण्य आहे. नागपूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी हिंगणा तालुक्‍यातील अडेगाव येथे बोर अभरण्याचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. पावसाळा सुरू होताच हे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात येते. मात्र, पावसाळा संपताच 1 ऑक्‍टोबरपासून पुन्हा पर्यटकांसाठी प्रवेशद्वार उघडण्यात येते. यावर्षी दिवाळीपर्यंत संततधार पाऊस सुरू आहे. 
सतत पडणाऱ्या पावसामुळे बोर अभयारण्यातील पर्यटनासाठी असलेले मुख्य रस्ते अद्यापही पाण्याखाली बुडाले आहे. यामुळे वाहन जाण्याची कुठलीही शक्‍यता नाही. पावसामुळे आठ ते नऊ फूट उंच गवतही रस्त्याच्या कडेला वाढलेले आहे. बोर धरणालगत पर्यटनाचा मुख्य रस्ता आहे. पाणीच पाणी या रस्त्यावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या प्रवेशद्वारावरील ऑनलाइन बुकिंगसुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. 
दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या प्रमाणात वाघोबाच्या दर्शनासाठी अडेगाव गेटवर दाखल होतात. यावर्षीही अनेक पर्यटक येऊन परत गेले. अभयारण्यातील मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने पर्यटन बंद ठेवण्याचा आदेश वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिला असल्याचे समजते. पाऊस जोपर्यंत कमी होणार नाही, तोपर्यंत पर्यटनाच्या रस्त्यावरील पाणी उतरणार नाही. यामुळे वातावरणातील बदल होऊन कडक उन्हं पडल्यास पर्यटन सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 1 नोव्हेंबरपासून पर्यटनाच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले गवत कापण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वार केव्हा सुरू होईल, याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. 
बोर अभयारण्य वाघ व इतर वन्यप्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या सणातील सुट्टीत वाघोबाचे दर्शन हावे, अशी पर्यटकांची इच्छा असते. मात्र, पावसामुळे या इच्छेवर विरजण पडल्याचे चित्र दिसून येत आहे. 
बोर धरणाच्या जलपातळीत वाढ 
बोर अभयारण्यात वन्यप्राण्यांची तहान भागवणारे बोर धरण आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या काळात बोर धरणात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, उशिरा लांबलेल्या पावसाने धरणातील पाण्याचा तुटवडा भरून काढला. सद्यस्थितीत बोर धरणात 80 टक्‍केच्या जवळपास जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळेच बोर धरणाची पाण्याच्या ओलाव्यामुळे पर्यटनाचे रस्ते पाण्याखाली आले आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांनाही पुरेल एवढा पाणीसाठा बोर धरणात उपलब्ध झाला आहे. 
गाइडची दिवाळी अंधारात 
बोर अभयारण्याच्या प्रवेश द्वाराजवळ वन्यजीव विभागाने 19 गाइडची नियुक्ती केली आहे. ऐन दिवाळीत प्रवेशद्वार यावर्षी बंद असल्याने हातचा रोजगारही हिरावला आहे. आदिवासी समाज बांधवांची गाइड म्हणून नियुक्ती केली आहे. वनविभागाकडून यांना साधे मानधनही दिल्या जात नाही. यामुळे यावर्षीची दिवाळी सर्वांची अंधारात गेली आहे. वन मंत्रालयाने किमान गाइडला मानधन सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adegaon entrance to Bore Sanctuary "locked"