एका विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांना मोजावे लागताहेत पाच हजार रुपये!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

दरवर्षी मे महिन्यात शिक्षकांना सुट्टयाच्या कालावधीतही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पायपीट करावी लागते. शाळेतील विद्यार्थी संख्या कायम ठेवण्यासाठी संस्था चालकांकडून प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी प्रवेशाचे टारगेट दिले जाते.

गडचिरोली : नोकरी वाचवायची असेल तर विद्यार्थी आणा. हा फंडा खाजगी शाळा दरवर्षीच राबवतात. प्रत्येक उन्हाळ्यात शिक्षकांच्या डोक्यावर टांगती तलवार असतेच.यंदा तर हे संकट अधिकच वाढले आहे. विद्यार्थी प्रवेश महागला असून शिक्षकांना एका विध्यार्थ्यामागे पाच ते सहा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे पालकांनी आपली डिमांड वाढवली असून या प्रकाराचा आर्थिक फटका खासगी शिक्षकांना बसत आहे.
दरवर्षी मे महिन्यात शिक्षकांना सुट्टयाच्या कालावधीतही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पायपीट करावी लागते. शाळेतील विद्यार्थी संख्या कायम ठेवण्यासाठी संस्था चालकांकडून प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी प्रवेशाचे टारगेट दिले जाते. ते पूर्ण करण्यासाठी दरवर्षी शिक्षकांना गावोगावी फिरावे लागते. या कामासाठी पालकांना वस्तू तसेच सायकलींचे प्रलोभन दिले जात असते. शाळेतून दाखला काढण्यासाठी लागणा-या किरकोळ खर्चाची पूर्तता करून प्रवेश प्रक्रिया केली जात होती. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे पालकांकडून आपल्या पाल्यांना लागणा-या वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाची मागणी शिक्षकांकडून केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दाखला पाहिजे तर आधी पाच हजार रुपये नगदी द्या, त्यानंतरच शाळा प्रवेशाचे बोला अशी तंबी दिली जात असल्याने नाइलाजास्तव शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी पालकांची इच्छा पूर्ण करावी लागत आहे.
लॉकडाऊनमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे सरकारवर आर्थिक संकट ओढवल्याने वेतनाची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत खासगी शिक्षकांना मात्र, विद्यार्थी प्रवेशासाठी पाच ते सहा हजार रूपये खर्च करावे लागत आहे. विद्यार्थी प्रवेशासाठी पालकांच्या दारी गेल्यानंतर पालकांकडून आर्थिक समस्येचा भडीमार केला जात आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, शेतीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...

त्यामुळे मुलाच्या शिक्षणावर खर्च कुठून व कसा करायचा असा प्रश्‍नउपस्थित करून टीसी पाहिजे असल्यास शैक्षणिक खर्च आम्हाला द्या अशी मागणी केली जात असल्याने नाइलाजास्तव शिक्षक पालकांची मागणी पूर्ण करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. महागाईमुळे शिक्षण महाग झाले असले तरी आता ग्रामीण भागात विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission process is very difficult for teachers