
हे गट समोरासमोर आल्यामुळे ठाण्याच्या परिसरात शिवीगाळ, वाद सुरू झाला. पोलिस निरीक्षक लहू मोहंदुळे व उपनिरीक्षक चाफले यांनी त्या लोकांची समजूत काढून ठाण्याच्या बाहेर जाण्याची विनंती केली. परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
धारणी (जि. अमरावती) : परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन गटांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतरही पोलिस ठाण्याच्या परिसरातच जमून दोन्ही गटांनी वाद घातला. त्यानंतर ठाण्यावरच दगडफेक केल्याने पीएसआयसह पाच कर्मचारी जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास धारणी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आहे.
सलीम शेख अजगर (रा. उतावली, धारणी) व रयना बानो मो. असलम (वय 35) या दोघांनी परस्परविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. उधारीचे पैसे मागण्यावरून त्यांच्यात फोनवरून आधी संभाषण झाले. त्यानंतर वाद वाढला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे बघून दोन्ही गट तक्रार नोंदविण्याकरिता धारणी ठाण्यात दाखल झाले. परस्परविरुद्ध तक्रारीवरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलिसांनी घेतली.
अवश्य वाचा- कोविड कक्षात जायची वेळ येऊ देऊ नका, अन्यथा जेवणात मिळेल गोम....
हे गट समोरासमोर आल्यामुळे ठाण्याच्या परिसरात शिवीगाळ, वाद सुरू झाला. पोलिस निरीक्षक लहू मोहंदुळे व उपनिरीक्षक चाफले यांनी त्या लोकांची समजूत काढून ठाण्याच्या बाहेर जाण्याची विनंती केली. परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांच्यात वाद वाढला. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांवर राग काढत जमावातील काहींनी ठाण्यावर दगड भिरकावले. या दगडफेकीत पीएसआय चापले, पोलिस कर्मचारी राहुल पवार, बाळापुरे, योगेश राखुंडे व दोन महिला पोलिस किरकोळ जखमी झाले.
दोन्ही गटातील वादानंतर उद्भवलेली परिस्थिती ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. त्यात धुमाकूळ घालणारे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात जमावबंदी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक लहू मोहंदुळे यांनी सांगितले.
दोन गटात आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यावर पोलिसांनी आवश्यक कारवाई केली. वादानंतर गुन्हे दाखल केले. आता त्यांच्या अटकेची कारवाई सुरू केली आहे.
- डॉ. हरिबालाजी एन., पोलिस अधीक्षक, अमरावती.
संपादन : राजेंद्र मारोटकर