
कोरोना पॉझिटिव्ह व हायरिस्क कॉन्टॅक्ट संशयितांना वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याचा दावा मेडिकल प्रशासनाकडून करण्यात येतो.
यवतमाळ : मागील एक महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. रोजच दोन आकडी पॉझिटिव्ह अहवाल येत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात शासकीय यंत्रणेकडून बैठका घेण्यात येत आहेत. तर, वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व हायरिस्क कॉन्टॅक्ट संशयितांना वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याचा दावा मेडिकल प्रशासनाकडून करण्यात येतो. प्रत्यक्षात रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे. कोविड सेंटरमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या सायंकाळच्या जेवणात गोम आढळली. बाधिताने तत्काळ फोटो व व्हिडिओ काढून अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांच्या मोबाईलवर पाठविल्याने हा प्रकार समोर आला.
अधिक माहितीसाठी - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
प्रा. प्रजापती यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार करून हा प्रकार लक्षात आणून दिला. सहा एप्रिल रोजीदेखील जेवणात अळी निघाल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर जेवणाचा दर्जा काही प्रमाणात सुधारण्यात आला होता. मात्र, पुन्हा "जैसे थे' स्थिती निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असून, पौष्टिक आहाराचे बारा वाजल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोनावर अजूनही लस निघालेली नाही. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी पोषक व पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात कारागृहातील कैद्यांपेक्षा बाधितांचे हाल अधिक होत आहेत.
दोषींवर होईल कारवाई
वैद्यकीय महाविद्यालयात कोरानाबाधितांची पुरेपूर काळजी घेतली जाते. जेवणासंदर्भात आलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- डॉ. आर. पी. सिंह
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.
असे का घडले? - दोन वर्षांपासून होते प्रेमसंबंध, तिने लग्नाचा तगादा लावला आणि..
...अन्यथा न्यायालयात जाणार
पॉझिटिव्ह रुग्णांना गोम असलेले जेवण मिळणे चिंताजनक आहे. बाधितांनी फोटो काढून व्हॉट्स ऍपवर पाठविले. जिल्हाधिकारी व अधिष्ठातांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही.
-प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती
सदस्य, अभ्यागत मंडळ, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ
संपादन - अतुल मांगे