चिंताजनक : या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याने प्रशासनाने एकच दिवसआगोदर जिल्हा कोरोना मुक्त होऊन ग्रीन झोनकडे वाटचाल केली होती.

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोना बाधित व्यक्ती न आढळल्याने आणि नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तिघांना काल (ता.10) कोविड रुग्णालयातून सुट्टी झाल्याने जिल्हा कोरोनामुक्ती झाल्याचा हर्ष होता. परंतु, अवघ्या काही तासातच या आनंदावर विरजन पडले असून, जळगाव जामोद येथे एक व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याने प्रशासनाने एकच दिवसआगोदर जिल्हा कोरोना मुक्त होऊन ग्रीन झोनकडे वाटचाल केली होती. परंतु, बाधित व्यक्ती आढळल्याने संकट ओढवले आहे. जळगाव जामोद येथील एक व्यक्ती बऱ्हाणपूर येथे नातेवाइकाकडे अंत्यविधी कार्यक्रमात सहभागी झाली होती.

आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात

दरम्यान, त्या कार्यक्रमात सहभागी व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना बाधित चाचणी करण्यात आली असता तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अजून काही व्यक्तींचे रिपार्ट घेतले असता एकूण तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आले होते. यानंतर बऱ्हाणपूर येथील प्रशासनाच्यावतीने अजून बाधितांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेण्यात आला असता त्यामध्ये जळगाव जामोद येथील व्यक्तीही कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ खामगाव व तेथून बुलडाणा येथे पाठविले. 

याठिकणी एकूण दोन व्यक्तीचे नमुने घेण्यात आले असून, त्यातील एकाच निगेटिव्ह तर एकाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात काळजी घेऊन बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही तपासणीसाठी खामगाव येथे पाठविले असून, त्याचे अहवाल प्रतीक्षेत आहे. स्थानिक प्रशासनाने शहरातील परिसर सील केला आहे तर व्यापारी संघटनेला त्याचे दुकाने, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: again corona patient found in buldana district