धनगर समाजाचे अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 13 आॅगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे दिले.

अकाेला - धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी (ता. 13) धरणे दिले. यावेळी समाजातील हजाराे नागरिक उपस्थित हाेते.

अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 13 आॅगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे दिले. धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती द्याव्यात याकरिता समस्त धनगर समाजाचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वास्तविक देशाच्या सर्वोच्च घटनेने धनगर समाजास आरक्षण दिलेले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 नुसार केलेला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे धनगर समाजास आरक्षणाच्या सोयी सवलती मिळणे आवश्यक आहे. परंतू राज्य शासनाने यासंदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याने धनगर समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे. न्याय मागण्यांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. त्यानंतर सुद्धा राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताच कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजस आरक्षणाच्या सवलती देण्याविषयी केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी बारामती येथे केली होती. मात्र सरकार सत्तेवर येऊन जवळपास चार वर्ष लोटली तरीही आरक्षणाच्या संदर्भात ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे.

महिलांची उपस्थिती
आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या धरणे आंदोलनात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील महिलांनी सकाळपासूनच आंदोलनस्थळी हजेरी लावली. यावेळी महिलांनी येळकोट-येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणा दिल्या.

पिवळ्या टाेप्या; झंड्यांनी वेधले लक्ष
आंदाेलनात सहभागी आंदाेलकांनी पिवळ्या टाेप्या परिधान केल्या हाेत्या. त्यावर जल मल्हार, मी धनगर, अशी घाेषणा सुद्धा लिहलेली हाेती. आंदाेलकांच्या हाती असलेल्या पिवळ्या झंड्यांनी व पिवळ्याच दुपट्ट्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation of Dhankar community in front of Akola District Collector office