esakal | गडचिरोलीला प्राणवायू पुरविण्यासाठी 'ते' सरसावले; भरून दिले 200 ऑक्‍सिजन सिलिंडर

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन सिलेंडर
गडचिरोलीला प्राणवायू पुरविण्यासाठी 'ते' सरसावले; भरून दिले 200 ऑक्‍सिजन सिलिंडर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देसाईगंज (जि. गडचिरोली) : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक घटनांमधून प्रशासनाची हतबलताही दिसून येत आहे. अपुऱ्या साधनांनी कोरोनाशी लढणे शक्‍य नाही. म्हणून आता प्रशासनाच्या मदतीला समाजातील सक्षम, सुहृदयी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन देसाईगंज येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा युवा समाजसेवक आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांनी गडचिरोली जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा करण्याचा संकल्प करत 200 ऑक्‍सिजन सिलिंडर दिले आहेत.

हेही वाचा: उन्हाळा वनकर्मचाऱ्यांसाठी ठरतोय कर्दनकाळ; वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी पाहारा

सध्या कोरोना व त्यातही डबल म्युटंट कोरोनामुळे सर्वत्र मृत्यू तांडव सुरू आहे. अनेक रुग्ण ऑक्‍सिजन न मिळाल्याने दगावत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णालयात होत असलेली ऑक्‍सिजनची कमतरता आकाश व कैलास अग्रवाल यांच्या लक्षात आली. त्यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती जाणून घेतली.

जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये म्हणून ऑक्‍सिजन देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून ऑक्‍सिजनचे 200 रिकामे सिलिंडर मागवून ते भरून देण्याची तयारी सुरू केली. त्यांनी नागपूरशी संपर्क साधून हे रिकामे सिलिंडर नागपूरला पाठविले. त्यानंतर शनिवार (ता. 24) रात्री त्यांचा 200 ऑक्‍सिजन सिलिंडर भरलेला ट्रक गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. जिल्ह्याला प्राणवायू पुरविण्यासाठी मदत केल्याबद्दल या उद्योगपती अग्रवाल बंधूंचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

हेही वाचा: विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

इतरांनीही पुढे यावे...

सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कोरोनाच दुसरी घातक लाट भयंकर असून मोठे मृत्यूसत्र सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या परीने हे संकट दूर सारण्यासाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. म्हणून अग्रवाल बंधूंप्रमाणेच समाजातील इतर सक्षम, सुहृदयी नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी स्वयंस्फूर्तीने मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ