esakal | उन्हाळा वनकर्मचाऱ्यांसाठी ठरतोय कर्दनकाळ; वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी पाहारा

बोलून बातमी शोधा

उन्हाळा वनकर्मचाऱ्यांसाठी ठरतोय कर्दनकाळ; वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी पाहारा
उन्हाळा वनकर्मचाऱ्यांसाठी ठरतोय कर्दनकाळ; वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी पाहारा
sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) ः जनावरांना चराईबंदी असल्यामुळे मेळघाटच्या काही पशुपालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आगी लावल्या जातात. असे प्रकार उन्हाळ्यातच अनेकदा घडत असल्यामुळे उन्हाळा वनविभागासाठी आव्हानात्मकसह कर्दनकाळ ठरत आहे. वनसंवर्धनासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळा अग्निपरीक्षेसारखाच आहे.

हेही वाचा: विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात अत्यंत भयाण स्थिती राहते. या दिवसात हिरवेगार असणारी झाडे कोमेजून जातात. पानगळीमुळे सर्वत्र शुकशुकाट असतो. सूर्याचा थेट प्रकाश वनजमिनीवर पडत असल्यामुळे उन्हाळा वन्यप्राणी व वनकर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतो. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी वनविभागाला सातत्याने लक्ष ठेवावेच लागते.

रखरखत्या उन्हात वनाची सुरक्षा सांभाळणाऱ्यांसाठी त्यांना अग्निपरीक्षाच द्यावी लागते. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत, तर गवत सुकलेले असल्यामुळे वणव्याची भीती आहेच. मात्र त्यापेक्षाही भयंकर स्थिती जंगलात आगी लावल्या जात असल्यामुळे निर्माण झाली आहे. जंगलात लागणाऱ्या आगींमुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होऊन वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्‍यात येत आहे.

परिणामी असे प्रकार थांबविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना दिवसरात्र लक्ष द्यावे लागत आहे. आग विझविण्याचे सातत्याने प्रयत्न करावे लागतात. मात्र अद्याप आग लागण्याच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात जंगल जळाले असून त्यामुळे वनसंपदेची प्रचंड हानी झाली आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! महिनाभरात एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला; अख्ख्या गावात पसरली शोककळा

आगी लागण्याची कारणे

जंगलात चराईबंदी ही पशुपालकांच्या जिव्हारी लागते. अशाप्रसंगी वनविभागावर कारवाईचा वचपा काढण्यासाठीसुद्धा आगी लावल्या जात असल्याचे सांगण्यात येते. तर काही वनविभागाच्या कारवाईने दुखावलेले व्यक्ती जंगलात आगी लावतात, तसेच अनावधानाने अनेकजण जंगलातून जाताना जळती विडी, सिगारेट फेकून देतात, अशा अनेक कारणामुळे जंगलाला आग लागत असल्याचे सांगण्यात येते.

संपादन - अथर्व महांकाळ