Agri Tourism : कृषी पर्यटनासाठी कृषी विद्यापीठाचा पुण्यातील संस्थेसोबत समंजस्य करार | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agri Tourism

Agri Tourism : कृषी पर्यटनासाठी कृषी विद्यापीठाचा पुण्यातील संस्थेसोबत समंजस्य करार

अकोला : सध्याच्या काळात कृषी पर्यटन या व्यवसायाला जागतिक स्तरावर संधी प्राप्त होत आहे. कृषी पर्यटन हा एक कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रसिद्ध होत आहे. या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी कृषी पर्यटन विकास या क्षेत्रामधील संधींचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने कृषी पर्यटन विकास संस्था, पुणे यांचे समवेत सामंजस्य करार केला.

सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कृषी पर्यटन केंद्र विकसित करून त्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. कृषी पर्यटन क्षेत्रातील प्रचंड संधीचा विचार करून विद्यापीठाने कृषी पर्यटन विकास संस्था, पुणे यांचे समवेत कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्याचे ठरविले आहे.

या संस्थेने महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेसहाशे कृषी पर्यटन केंद्रांचे जाळे निर्माण केले आहे. कृषी पर्यटन विकासाचे विविध प्रकारचे मॉडेल्स विकसित केले आहे. विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण केंद्र येथे उपलब्ध असलेल्या जागेवर सदर कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांचे उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, कृषी पर्यटन विकास संस्था पुणे यांचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, सदस्य अरुण क्षीरसागर, श्री पायगुडे आणि श्री बलकवडे, कृषी पद्धती व पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र इसाळ, कुलगुरू यांचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अजय सदावर्ते, एकात्मिक शेती पद्धती केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत देशमुख, सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन कोंडे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे उपस्थित होते.

हा होईल फायदा!

- कृषी पर्यटन या क्षेत्रातील संधींचा अधिक कार्यक्षमरीत्या उपयोग करता येईल.

- कौशल्य विकासाच्या दृष्टीने पद्युत्तर पदविका अभ्यासक्रमसुद्धा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

- नैसर्गिक स्त्रोतांचा कार्यक्षमरित्या उपयोग करून शेतीपूरक व्यवसायांना अधिक अधोरेखित करता येईल.

- कृषी पूरक व्यवसाय आणि तंत्रज्ञानाला चालना देणारा एक स्त्रोत.

- राज्यातील मॉडेल प्रशिक्षण केंद्र तथा उत्कृष्ट कृषी पर्यटनाचे मॉडेल म्हणून उदयास येईल.

टॅग्स :agricultural news