
महाराष्ट्रातील भुसावळहूनही दुसरा कॉरिडॉर जात आहे. म्हणजेच संपूर्ण विदर्भासहित महाराष्ट्र व मध्यप्रदेशचे शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना फार मोठी सुविधा उपलब्ध होईल. तिन्ही कॉरिडॉर जोडले गेल्यानंतर मालवाहतुकीच्या दृष्टीनेही देशाच्या मध्यभागी असणारे नागपूर महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूरमार्गे इटारसी ते विजयवाडा दरम्यान ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरची’ची घोषणा करण्यात आली आहे. मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे देशांतर्गत मालवाहतुकीला वेग आणि चालना मिळणार आहे. परिणामी महाराष्ट्र, मध्यप्रदेशचे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांना फायदा होण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचीही शक्यता आहे.
सध्या प्रवासी व मालवाहतूक एकाच रूळांवरून सुरू आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता यापूर्वीच चतुःसीमा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरची घोषणा करण्यात आली. त्याचे कामही जोमाने पुढे जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात मालवाहतुकीचे अन्य पर्याय बंद असताना रेल्वेने मात्र मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित करीत चांगले उत्पन्न मिळविले. किसान रेल्वेसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने अधिकाधिक व्यापारी मालवाहतुकीसाठी रेल्वेवर विश्वास टाकू लागले आहे. यामुळे रेल्वेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ही सकारात्मक बाब लक्षात घेता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनयांनी खडकपूर ते विजयवाडा, भुसावळ ते खडकपूर आणि इटारसी - नागपूर- विजयवाडा या तीन नव्या कॉरिडोरची घोषणा केली. नागपूरमार्गे जाणाऱ्या प्रकल्पाला उत्तर- दक्षिण कॉरिडॉर संबोधण्यात आले आहे. एकूण ९५७ किमी लांबीच्या या मार्गापैकी अर्ध्याहून अधिक म्हणजेच तब्बल ५०८ किमी मार्ग मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून जाणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील भुसावळहूनही दुसरा कॉरिडॉर जात आहे. म्हणजेच संपूर्ण विदर्भासहित महाराष्ट्र व मध्यप्रदेशचे शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना फार मोठी सुविधा उपलब्ध होईल. तिन्ही कॉरिडॉर जोडले गेल्यानंतर मालवाहतुकीच्या दृष्टीनेही देशाच्या मध्यभागी असणारे नागपूर महत्त्वाचे ठरणार आहे.
देशातील ब्रॉडगेजमार्गाचे २०२३ पर्यंत शंभर टक्के विद्युतीकरण करण्याचे रेल्वेने निश्चित केले आहे. यासंदर्भात आजच्या अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा विचार केल्यास सर्वच मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा विचार केल्यास नैनपूर-छिंदवाडा दरम्यान १४१ किमी मार्गाचे विद्युतीकरण प्रगतिपथावर आहे. अर्थसंकल्पीय घोषणेमुळे या कामालाही वेग येणार असून जूनपर्यंतच या मार्गावरील कामे पूर्ण होतील असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याशिवाय नागपूर-नागभीड या ११० किमी मार्गाच्या गेजपरिवर्तनाचे काम सुरू करण्यात आले आहे. रूळ टाकण्याचे काम पूर्ण होताच या मार्गावरही विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल आणि संपूर्ण नागपूर विभाग विद्युतीकरण युक्त होणार आहे.
प्रथमदर्शनी संतुलित अर्थसंकल्प
अद्याप पिंकबूक आले नसल्याने रेल्वे प्रकल्पाना मिळालेल्या निधीबाबत फारशी स्पष्टता नाही. पण, प्रथमदर्शनी संतुलित अर्थसंकल्प आहे. पायाभूत विकासाला चालना देण्यात आली आहे. विदर्भातील प्रकल्प नक्कीच मार्गी लागतील.
- डॉ. प्रवीण डबली,
माजी सदस्य, प्रादेशिक रेल्वे सल्लागार समिती