दार उघड आता दार उघड...बाजार समित्यांचे दार उघड

APMC.jpg
APMC.jpg

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामध्येच शेतमाल विक्रीची एकमेव बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा शेतमाल शेतातच पडून खराब होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांचे दरवाजे उघडणार कधी, अशा प्रश्न शेतकरी तसेच शेतकरी संघटनांकडून केला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीपासूनच लॉकडाऊन करण्यात आले होते. ग्रामीण भागातसुद्धा लॉकडाऊनमुळे सर्व काही स्थिरावलेले असून, शेतकऱ्याचा शेतमाल सुद्धा शेतातच अडकून पडला आहे. शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून जरी भाज्या व फळांची विक्री व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असला तरी, मोठ्या प्रमाणात कांदा, गहू, मिरची, हळद, कलिंगड, पपई व इतरही विविध प्रकारचा कोट्यवधीचा शेतमाल शेतातच पडून आहे. लॉकडाऊन झाल्यापासून वाहतूक व्यवस्था मंदावल्याने तसेच बाजार समित्या सुद्धा बंद असल्याने, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्याची सुविधा उरलेली नाही. त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली असून, येऊ घातलेला खरीप पेरायचा कसा, याची चिंता त्यांना लागली आहे.

सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन होईल खरेदी
सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये टोकन पद्धतीने गव्हाची खरेदी केली जात आहे. शिवाय जिल्ह्यात पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा हमाभावाने शेतमाल खरेदीची परवाणगी देण्यात आली आहे तसेच जिल्ह्यात व्हीसीएमएफ व डीएमओ यांचे अंतर्गत तूर, हरभरा सुद्धा खरेदी केला जाणार आहे.
- डॉ.प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला

प्रत्येक शेतमालासाठी दिवस वाटून द्यावा
सोशल डिस्टंन्सिंग ठेऊन शेतकऱ्यांकडील शेतमाल बाजार समित्यांमध्ये घेण्यात यावा. सोशल डिस्टंन्सिग ठेवण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या शेतमालासाठी वाटून देण्यात यावा व त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी. यानुसार प्रत्येक दिवशी एकाच शेतमालाची आवक घेण्यात यावी, जेणे करुन शेतकऱ्याचा सर्वच शेतमाल विक्री होईल व व्यापाऱ्यांनाही कच्चा माल मिळेल, असा सल्ला उद्योजकांकडून देण्यात आला आहे.

पावसाचे संकट घालतेय घिरट्या
शेतकऱ्यांचा बहुतांश माल अजूनही शेतातच असून, हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी पाऊस तसेच गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तविली आहे. त्यामुळे कोरोनामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याला आता पावसाने सुद्धा धास्तावून सोडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com