कार्यालयासोबतच कुरघोडीचे हस्तांतरण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नुसते कार्यालयच मराठवाड्याकडे हस्तांतरित झाले नसून कुरघोडीचे राजकारणही हस्तांतरित झाले आहे. तीन वर्षांपूर्वी ‘आजपर्यंत कुणीही न केलेले...’ असा नारा देऊन महामंडळाचा कारभार विदर्भात सुरू झाला आणि आता ‘आम्ही आमच्या पद्धतीने करू’ असा नारा देऊन मराठवाड्याने कारभार स्वीकारला. थोडक्‍यात या कुरघोडीत मराठीचा मुद्दा आपोआपच मागे पडतो आणि वैयक्तिक कुरघोडीचे राजकारण स्पष्ट होते. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ एप्रिल २०१६ मध्ये विदर्भात आले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि यापुढे महामंडळ संमेलनांसाठी नव्हे तर, मराठीच्या कल्याणासाठी काम करेल, असे त्यांनी जाहीर केले. ‘संमेलन मॅनिया’तून महामंडळाला बाहेर काढण्याचा विडाच त्यांनी उचलला होता. दोन दिवसांपूर्वी महामंडळाचा कारभार  स्वीकारताना नवे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘संमेलन हेच महामंडळाचे मुख्य कार्य आहे’ असे सांगून काउंटर केले. जुने संदर्भ टाळून पुढे जाऊया, असे म्हणतानाही पत्रकार परिषदेतील प्रत्येक उत्तरात जुने संदर्भ आल्याशिवाय राहात नव्हते. ‘घोषणा करण्याची घाई’ या  तीन शब्दांत त्यांनी पूर्वीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ स्पष्ट केला. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि कौतिकराव ठाले-पाटील या दोघांच्याही बोलण्यात एकच कॉमन दुवा आहे, तो म्हणजे ‘घटनेनुसार’. डॉ. जोशी यांनी तीन वर्षे घटनेचा आधार घेऊनच अनेक गोष्टी आपण करीत असल्याचे सांगितले आणि त्यातील अनेक गोष्टी घटनेनुसार कशा अपूर्ण आहेत, हे काल कौतिकराव सांगत होते.

नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचे खापर महामंडळावर फोडले जात असताना खरे आरोपी यजमान आहेत, असे डॉ. जोशी सांगतात. तर कौतिकराव महामंडळाकडून झालेले पाप आता धुवून निघणे शक्‍य नाही, असे सांगतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि कोकण मराठी साहित्य परिषद या दोघांनाही महामंडळाच्या अख्त्यारित  घेण्यात आल्याची घोषणा डॉ. जोशी यांनी ‘घटनेनुसार’ केली होती. तर कौतिकरावही ‘घटनेनुसार’ ते झालेलेच नाही, असे सांगतात. मुळात वर्षोनुवर्षे प्रादेशिक वादापेक्षा वैयक्तिक वादाचे पडसाद एकूणच महामंडळाच्या कारभारावर पडताना दिसत आहेत. तेही मराठीसाठी धडपडत होते आणि हेदेखील मराठीसाठी धडपडणार आहेत. त्यामुळे साहित्य महामंडळाचा कारभार मागच्या  पानावरून पुढे सुरू झाला आहे, असे समजायला हरकत नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan Politics