शेतकरी गटांनी पोहोचविल्या शेतकऱ्यांपर्यंत कृषी निविष्ठा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी येऊन गर्दी केल्यास कोरोना संसर्गाचा मोठा धोका उद्भवू शकतो. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत कृषी निविष्ठा ( बियाणे, खते, कीटकनाशके) पोहोचविण्याचा उपक्रम शेतकरी गटांनी कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविला आहे.

 

अकोला  : कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी येऊन गर्दी केल्यास कोरोना संसर्गाचा मोठा धोका उद्भवू शकतो. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत कृषी निविष्ठा ( बियाणे, खते, कीटकनाशके) पोहोचविण्याचा उपक्रम शेतकरी गटांनी कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविला आहे.

उपक्रमांतर्गत यंदाच्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठा थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास शेतकरी गटांनी सुरुवात केली असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविल्या जात आहेत. आत्मा प्रकल्पा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटांमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

बार्शीटाकळी तालुका
तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा बार्शीटाकळी अंतर्गत शेतकऱ्याच्या बांधावर खते/ बियाणे/ कीटकनाशके हा उपक्रम राबवित मंगळवारी (ता.५) कान्हेरी सरप येथील शेतकऱ्यांना निविष्ठा पोहचविण्यात आल्या. व्यक्तिगत अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करीत गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत माऊली कृषी सेवा केंद्र बार्शीटाकळी येथून ५० बॅग सोयाबीन बियाणे, ३० बॅग खते, १५ लिटर कीटकनाशक, २० लिटर तणनाशकांची खरेदी केली.

अकोला तालुका
अकोला तालुक्यातील बहिरखेड, खरप, गोणापुर, पळसो, दापुरा, कासली, दोनवाडा, वडद येथील शेतकरी गटांनी आपातापा येथून १२३५ बॅग सोयाबीन बियाणे, ९०८७ खतांच्या बॅग खरेदी करून शेतकऱ्यांना पोहचविल्या.

तेल्हारा तालुका 
गणेश कृषी सेवा केंद्र तेल्हारा येथून शेरी वडनेर व शेरी बुद्रुक येथे दोन शेतकरी गटांना एकूण ५८ बॅग खताचा पुरवठा त्याच्या गावात त्यांच्या बांधापर्यंत करण्यात आला. या उपक्रमामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही व कोणाचा प्रादूर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Agricultural inputs delivered by farmers to farmers