निष्काळजी धोकादायक

amc
amc

अकोला : अकोला महापालिका प्रशासनाला शहरातील जीर्ण इमारती वेळेत पाडून नागरिकांची सुरक्षा करण्याबाबत दाखविलेल्या निष्काळजीने आणखी एका इमारतीचा बळी घेतला. सुदैवाने रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेने जिवित हानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने वरातीमागून घोडे पळविताना पडलेल्या इमारतीसाठी गुरुवारी (ता.2) नोटीस बजावली.


मनपाच्या उत्तर झोनमध्ये येणाऱ्या जुना कापड बाजारातील निर्मल स्वीट मार्टची इमारत बुधवारी रात्री कोसळली. या इमारतीच्या बाजूला असलेली जुनी इमारत पाडून तेथे तळमजल्याचे काम सुरू होते. महापालिकेकडून 47.27 चौरस मीटर तळघर खोदकामाची परवानगी घेतली असताना प्रत्यक्षात 139.67 चौरस मीटर खोदकाम केले जात होते. परिणामी बाजू असलेल्या पुरातन इमारतीला धक्का लागून ती बुधवारी संपूर्ण कोसळली. सोबतच त्याला लागून असलेली राधास्वामी हार्डवेअरची इमारतही कोसळण्याच्या मार्गावर आहे. रात्री घडलेल्या या घटनेनंतर उत्तर झोन क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधितांना फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगितले. ही नोटीस भिकूलाल जमनालाल शर्मा, गजानन नारायण शर्मा, मनिष मांगिलाल शर्मा, शिवलाल किसनलालजी भिंडा यांच्या नावाने बजावण्यात आली आहे.


80 वर्ष जुन्या इमारतीला नोटीसच नाही
जुन्या कापड बाजारातील राधास्वामी हार्डवेअरची इमारत 80 वर्षे जुनी आहे. याच इमारतीच्या आजुबाजूच्या इमारती जीर्ण असल्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली. या इमारतीकडे मात्र मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले. हा निष्काळजीपणा धोकादायक ठरत असल्याचे बुधवारी रात्रीच्या घटनेवरून स्पष्ट झाले.


इमारत पाडली की पडली?
निर्मल स्वीट मार्टच्या बाजूला असलेल्या जागेवर सुरू असलेल्या बांधकामामुळे इमारती कोसळली असल्याची तक्रार निर्मल स्वीट मार्टच्या संचालकांनी केली आहे. मनपाकडेही त्याबाबत तक्रार करण्यात आली असल्याची माहिती आहे. असे असतानाही वेळेच मनपा प्रशासनाने हस्तक्षेप का केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सुरू असलेल्या बांधकामांशी संबंधित जागेच्या मालकांमध्ये पार्टनर म्हणून एका मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निर्मल स्वीट मार्टची इमारती पडली की पाडली, अशी चर्चा घटनास्थळावर उपस्थित व्यापाऱ्यांमध्ये सुरू होती.


जीर्ण इमारतीविरुद्ध आतातरी कारवाई होणार का?
एकट्या उत्तर झोनमध्ये २०० ते २५० जीर्ण इमारती आहे. यंदाच्या पावसाळ्यात या इमारतींना मनपा प्रशासनाने नोटीसही बजावली होती. मात्र जीर्ण इमारत पाडण्याबाबत गांभिर्याने कारवाई होताना दिसत नाही. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर तरी जीर्ण इमारतीबाबतचा निष्काळजीपणा दूर करून गांभिर्याने कारवाई होणार की, काही बळी घेतल्यानंतरच मनपा प्रशासन कारवाई करणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com