रविकांत तुपकरांची बियाणे महामंडळावर धडक, बियाणे महामंडळाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान

Ravikant Tupkar hits Seed Corporation, farmers suffer due to wrongdoing of Seed Corporation
Ravikant Tupkar hits Seed Corporation, farmers suffer due to wrongdoing of Seed Corporation

बुलडाणा  ः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे महामंडळा कडून बियाणे निर्मितीसाठी सोयाबीनचे प्लॉट घेतले होते. त्यानंतर बियाणे महामंडळाने मार्चमध्ये बियाणे नापास केले व त्यानंतर बियाणे परत न देता पुन्हा तपासणी करून आता जुलैमध्ये हे बियाणे शेतकऱ्यांना परत केले. मात्र सध्या सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. मार्चमध्येच बियाणे परत केले असते तर शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला असता. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यामुळे रविकांत तुपकर यांनी 10 जुलै रोजी बियाणे महामंडळाच्या कार्यालयात धडक देऊन संबधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. महामंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी केली.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे महामंडळाकडून बियाणे निर्मितीसाठी सोयाबीनचे प्लॉट घेतले होते. सदर सोयाबीन डिसेंबर 2019 मध्ये बियाणे महामंडळाला दिले होते. बियाणे महामंडळाने ते सोयाबीन टेस्ट केले असता ते सोयाबीन नापास झाल्याचे मार्च 2020 मध्ये शेतकऱ्यांना कळविले. त्यावेळी सोयाबीनचा बाजारभाव 4200 रुपये होता. परंतु बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांची संमती न घेता ते सोयाबीन पुन्हा "रिटेस्टिंग" केले आणि त्यानंतर आता जूलै 2020 मध्ये शेतकऱ्यांना ते सोयाबीन पुन्हा नापास झाल्याचे कळविले. आज सोयाबीनचा बाजारभाव हा अंदाजे 3500 आहे.

महामंडळाने बियाणे जर शेतकऱ्यांना मार्चमध्येच परत केले असते तर शेतकऱ्यांना ते 4200 च्या बाजार भावाने विकता आले असते. परंतु बियाणे महामंडळाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना ते सोयाबीन 3500 च्या भावाने विकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 700 रुपये पेक्षा जास्त नुकसान होणार आहे.

ही बाब लक्षात येताच 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी बियाणे महामंडळाच्या बुलडाणा कार्यालयात 10 जुलै रोजी धडक देवून बियाणे महामंडळाने तात्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. तसेच त्यांनी बियाणे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.मारोडे यांना चांगलेच धारेवर धरले. तत्काळ नुकसानभरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. यावेळी राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

(संपादन-विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com