esakal | अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्त्व ‘विक’
sakal

बोलून बातमी शोधा

TAMBE

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा टोला; युवा नेतृत्व विकासावर देणार भर

अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्त्व ‘विक’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोल्यासह राज्यातील 13 जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व ‘विक’ आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला पाठबळ देण्याची गरज असून, त्यासाठी प्रदेश स्तरावरून ठोस उपाययोजना होत आहेत. युवा नेतृत्व विकासावर युवक काँग्रेसच्या माध्यमातून भर दिला जात असून, नेतृत्वाची उणीव या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी रविवारी अकोला येथे दिली.


युवक काँग्रेसतर्फे आयोजित निबंध स्पर्धा व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृह येथे तांबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, मनपातील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण, अंशुमन गायकवाड, आकाश कवडे, कपिल रावदेव आदींची उपस्थिती होती. युवक काँग्रेसच्या ‘यंग इंडिया के बोल’ या देशपातळीवरील निबंध स्पर्धेबाबत माहिती त्यांनी दिली. ही स्पर्धा राज्यातील समस्यांबाबत युवकांना बोलते करण्यासाठी असून, त्यामाध्यमातून युवक काँग्रेसच्या प्रवक्त्यांची निवड केली जाणार असल्याचे तांबे यांनी सांगतिले. काँग्रेसला राज्यात पूर्वीचे दिवस आणण्यासाठी युवक संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना जास्तीत जास्त उमेदवारी देवून त्यांच्यातील नेतृत्वगुणांना चालना दिली जाईल, असे तांबे म्हणाले.


अकोला जिल्हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता मात्र येथेच काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सर्वाधिक काम करावे लागेल. त्याला येथील नेतृत्व विक असल्याचे कारण देत, युवकांमधूनच नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे तांबे म्हणाले. अकोला शहरातील उड्डाणपुलाचे काम सोडले तर गत तीन वर्षांत बदल झालेला नाही. रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आंदोलने उभे केली जातील, असे तांबे यांनी सांगितले.


मनपा, जि.प. निवडणुकीसाठी युवकांना पाठबळ
राज्यात काँग्रेसला नवीन नेतृत्व तयार करावे लागणार आहे. ‘युवा जोडो’ अभियानातून नवीन नेतृत्व तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच महानगरपालिका व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवा उमेदवार दिले जातील. आजपासून दोन वर्ष या निवडणुकीसाठी आहे. राज्यात सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी या युवकांच्या मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे व योजना राबवून स्थानिक पातळीवर या युवकांचे नेतृत्व कसे प्रस्थापित होईल, यावर भर दिला पाहिजे, असे आवाहनही तांबे यांनी केले.


एटीकेटीत पास झालेल्या पक्षांचे सरकार
महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजे एटीईकेटीत पास होऊन पुढच्या वर्गात जाण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसारखे आहेत. ही काँग्रेसला मिळालेली संधी आहे. त्यातून संघटना बांधणीवर भर दिला पाहिजे, तरच काँग्रेसला राज्यात चांगले दिवस येतील, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले.


‘मेक इन इंडिया’साठी हिच संधी
जगभर कोरोना वायरस मुळे दहशतीचे वातावरण आहे. चीनसारख्या देशातून भारतात मोठ्याप्रमाणावर येणारा माल बंद झाला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी भारत इतर देशांसोबत व्यापारी संबंध वाढविण्यासाठी चाचपणी करीत आहे. त्यापेक्षा भारतातच अशा वस्तू तयार करणारे उद्योग वाढवून ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकारता येईल. त्यातून युवकांना रोजगारही उपलब्ध होईल आणि आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी संधी मिळेल, असे तांबे यांनी सांगितले.


शिक्षण क्षेत्राने दुवा व्हावे
शिक्षण आणि नोकरी याची सध्या कुठेही सांगड नाही. कौशल्य शिक्षणावर भर देवून स्थानिक उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करून स्थानिकांना त्यांच्याच जिल्ह्यात कसा रोजगार मिळेल, यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्‍यक आहे. नोकरी मिळवून देणारे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण क्षेत्राने दुवा म्हणून काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही तांबे यांनी व्यक्त केली.
 

loading image