esakal | अकोल्याचे ‘उडान’ अमरावतीहून!
sakal

बोलून बातमी शोधा

अकोल्याचे ‘उडान’ अमरावतीहून!

75 वर्षापासून अकोलकरांना प्रतीक्षा, निवडणुकांअाधी प्रश्न मार्गी लागेल का? 

अकोल्याचे ‘उडान’ अमरावतीहून!

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला- राज्यातील सोळा शहरांसाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानसेवा जाहीर केली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाकडे दुर्लक्ष करून अमरावती विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याने पुन्हा एकदा शिवणी विमानतळाचा प्रश्न सरकार दरबारी रखडल्याचे चित्र आहे. तेव्हा अकोलेकरांनी आणखी काही दिवस अमरावतीहून उडान सवारी करित शिवणी विमानतळाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वऱ्हाडाच्या विकासाचे हवाईद्वार म्हटल्या गेलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण रखडलेले आहे. सुरुवातील कृषी विद्यापीठाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा वाद होता. त्यात राज्य सरकारने आदेश काढून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जमीन विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित केली. या विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. आता त्यासाठी काही खासगी जमीनीची गरज अाहे. मात्र, त्याचेही अधिग्रहण रखडले आहे. 

75 वर्षापासून प्रतीक्षा कायम
मध्य भारतातील हवाई उड्डाणाची गरज लक्षात घेऊन १९४३ साली इंग्रज सरकारने हे विमानतळ उभारले होते. मात्र, नंतरच्या काळात या विमानतळाच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. आता केंद्र सरकारनेही हवाई वाहतुकीचे जाळे वाढविण्याचे धोरण आखल्याने अकोल्यातील शिवणी विमानतळाचा विकास निश्चित होईल अशी अाशा बाळगून अकोलेकर होते. राज्य सरकारनेही त्यासाठी सुरुवातीला पुढाकार घेतला मात्र, अलिकडे हे विस्तारीकरण केवळ कागदावरच रखडल्याचे चित्र आहे. अशातच उडाण योजनेत शिवणी विमानतळा ऐवजी अमरावती विमानतळाचा समावेश झाल्याने अकोल्याच्या पदरी पुन्हा निराशाच आली असल्याचे चित्र आहे. 

ही आहे अडचण
शिवणी विमानतळ सध्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ताब्यात आहे. रोजचे नागरी उड्डाण होण्यासाठी त्याचा चौफेर विकास आ‌वश्यक आहे. म्हणून आधी ते महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या ताब्यात घेतले जाईल. त्यानंतर येथून ये-जा करू इच्छिणाऱ्या कंपनीशी करार करुन पुढचा विकास केला होऊ शकतो.

या सोळा शहरातून उडाण
मुंबईवरून कोल्हापूर, जळगाव, बेळगाव, आग्रा, आदमपूर, अमरावती, दुर्गापूर, केसोड, झरसुगडासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. तर औरंगाबादवरून उदयपूर, नाशिकवरून बेळगावसाठी उड्डाणे सुरू होणार आहेत. सुमारे ६ विमान कंपन्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. ही विमान सेवा लवकरच सुरू होणार आहे. राज्यातून १६ शहरांसाठी उडाण सेवा सुरू होत असली, तरी दरम्यानच्या मार्गांसाठी ही सेवा उपलब्ध असेल. उदा. कोल्हापूर- मुंबई मार्गावरील सेवा पुणे शहरासाठी ही उपलब्ध असेल. त्यामुळे प्रत्यक्षात ही सेवा १६ पेक्षा जास्त शहरांसाठी उपलब्ध होणार आहे.

loading image