Video: लॉकडाऊनमधली शक्कल भारी, दोन क्रमांकाची एकच ‘लॉरी’, वाचा काय आहे प्रकार

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 1 May 2020

एका गाडीवर दोन दिवस वेगवेगळे क्रमांक असलेली गाडी जिल्ह्यात बोअरवेलचे काम करीत असल्याचा प्रकार उघडीस आल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी कारवाईसाठी धाव घेतली. 

 

अकोला ः अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांच्या कामातील घोळ शुक्रवारी तेल्हारा तालुक्यात उघडकीस आला. एका गाडीवर दोन दिवस वेगवेगळे क्रमांक असलेली गाडी जिल्ह्यात बोअरवेलचे काम करीत असल्याचा प्रकार उघडीस आल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी कारवाईसाठी धाव घेतली. 

अकोला जिल्हा हा कायम स्वरूपी पाणीटंचाईसाठी ओळखला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना केल्यात जातात. यावर्षी कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन असतानाही जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार मान्यता दिली. त्यात तेल्हारा तालुक्यातील 12 कुपनलिकांच्या कामाचाही समावेश आहे.

 

या कामांचे कार्यरंभ आदेश निघण्यापूर्वीच अभियंत्यांच्या आशीर्वादाने कामाला सुरुवात झाली. पाणी हा लोकांच्या जीवनावश्यक गरजेचा भाग असल्याने या कामांचे कौतुक केलेच पाहिजे. मात्र, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांना लोकांना सुविधा देण्यापेक्षा आपले खिसे कसे भरता येईल यावरच अधिक रस असतो. त्यातूनच तेल्हारा तालुक्यातील प्रकार घडला आहे. लॉकडाउनमध्ये सीमा ओलांडून अमरावती जिल्ह्यातील बोअरवेल मशीन गुरुवारी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात काम सुरू करण्यासाठी आली. 

शासनाचा बुडवला महसूल
विशेष म्हणजे जिल्हा ओलांडण्याबाबत कोणतीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. कार्यरंभ आदेश नव्हता. त्याहून मोठा घोळ म्हणजे ज्या गाडीचा पहिल्या दिवशी एमटीएल1770 क्रमांक होता तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बदलून जीजे24 बी 9581 झाला. एकच गाडी दोन क्रमांकांनी सीमा ओलांडून आणि दोन ठिकाणी कामे करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याची शक्यता या प्रकारातून उघडकील येते. यातून राज्य शासनाचा मोठ्याप्रमाणावर महसूल बुडविला जात असून पाणीटंचाईच्या कामांचा मलिदाही लाटल्या जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. 

अभियंते पोहोचले घटना स्थळावर
एकाच गाडीवर दोन वेगवेगळे क्रमांक लावून पाणीटंचाई उपाययोजनांच्या कामांवर काम करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याने यासंदर्भात गावकऱ्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांसोबत संपर्क साधळा. त्यातील मेढे नामक उपअभियंत्यांनी शुक्रवारी सहकाऱ्यासोबत घटना स्थळ गाठून कामाची पाहणी केली. बोअरवेल गाडी चालकाच्या बनावबनीवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola lockdown idea he chenge nuberplate borewell mashin at telhara