हे काय? चक्क लॉकडाऊनमध्येच उसळली बाजारात गर्दी

bajar.jpg
bajar.jpg

मूर्तिजापूर (जि. अकोला) : शहरातील सार्वजनिक ठिकाणी उसळणारी आणि विशेषतः मंगळवार (ता.7) बाजारात उसळलेली गर्दी लॉकडाउन अनलॉक झाल्याची निदर्शक ठरली. एकंदरीतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रास ऐशीतैशी केल्या जात असल्याची वास्तवकिता आहे. संपूर्ण जगाला मृत्युंच्या दाढेत ढकलायला निघालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन देशात जाहीर झाला आहे. मात्र, शहरात त्याचा पार फज्जा उडवणारे चित्र पहायला मिळत आहे. भाजी बाजार, रास्त भाव धान्य दुकाने, किराणा दुकाने, दूध डेअरी अशा ठिकाणी उसळणारी ग्राहकांची गर्दी अचंबित करणारी आहे. आठवडी बाजार बंद, सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत (तहसीलदारांनी दिलेल्या शासनाच्या नऊ ते नऊ च्या पत्रामुळे प्रशासनातील विसंवाद वेगळाच) खरेदी दरम्यान पाळावयाचे घालून दिलेले नियम पायदळी तुडविल्या जात आहेत.

नियमांचा होत आहे फज्जा
चुन्याची वर्तुळे नावापुरती उरली आहेत. दुकानांच्या काऊंटरवरच थेट ग्राहकांच्या झुंडी धडकताहेत. आठवडी बाजार भरल्यासारखी गर्दी आजच्या आठवडी मंगळवार बाजारात दिसून आली. व्यापारी, भाज्या विक्रेते एकमेकांमध्ये कुठलेही अंतर न ठेवता दुकाने थाटून बसले होते, तर ग्राहक अंतराला (सोशल डिस्टन्सिंग) पार हद्दपार करून व मास्क न वापरता बाजार करताना दिसले. शिवाय दुपारी दोन नंतरचा वेळ जणू काही गल्लोगल्लीत बैठकांसाठी राखीव ठेवण्यात आला की, काय असे चित्र रोजचेच झाले आहे. रिकामे फिरणारे, तर अगदी हक्काने लॉकडाउन अनलॉक झाल्याच्या आविर्भावात वावरतांना दिसून येत आहेत. बँकांमध्ये वाढणारी अस्ताव्यस्त गर्दी आणखी एक चिंतेचा विषय आहे.

प्रशासनाला करावा लागतो हस्तक्षेप
बँक ऑफ महाराष्ट्रच्या येथील शाखेत तर एवढी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली की, उपविभागीय अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला व उप विभागीय पोलिस अधिकाऱ्यांना आपली कूमक घेऊन स्वतः बँक गाठावी लागली. महसूल, पोलिस व आरोग्य विभाग आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना करीत आहे. अशा स्थितीत किमान आपल्या जीवाची जोखीम म्हणून तरी नागरिकांनी लॉकडाउन गांभिर्यपूर्वक पाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com