video : अकोल्याच्या असनारेंचा ‘मोर’ नाचला साहित्य अकादमीत!

mor01
mor01

अकोला: अकोल्यातील प्रख्यात कवी प्रशांत असनारे यांचा ‘मोर’ चक्क साहित्य अकादमीत नाचला... निमित्त होते उर्दू भाषांतरीत कविता संग्रहाचे... हा ‘मोर’ एवढ्यावरच थांबलेला नाही तर तब्बल 65 देशांतील विविध ग्रंथालयांतही त्याने फेर धरला आहे. मराठी साहित्यात अविट छाप सोडणारे प्रशांत असनारे यांच्या ‘मीच माझा मोर’ या काव्यसंग्रहाचे औरंगाबाद येथील प्रसिध्द कवी अस्लम मिर्झा यांनी उर्दू भाषेत ‘मोरपंख’ नावाने अनुवाद केला. परवा साहित्य अकामीने त्यावर भाषांतरित उत्कृष्ट साहित्यासाठी पुरस्कार रूपी मोहोर उमटविली.


दिल्लीत झालेला हा गौरव आपल्या गल्लीसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण भाषांतरित झालेल्या कवितांचे मूळ आपल्या अकोल्यातील आहे. असा गौरव प्राप्त करणारे ते अकोला जिल्ह्यातील एकमेव साहित्यिक ठरले आहेत. उर्दूत भाषांतरित झाल्याने हा ‘मोर’ एकदोन नव्हे तर चक्क  देश-विदेशातही मुशाफिरी करू लागला आहे. आज तो 65 देशांतील ग्रंथालात पिंगा घालतो आहे. 


‘मीच माझा मोर’ हा कवितासंग्रह 2010 साली प्रकाशित झाला होता. 2015 मध्ये औरंगाबादचे प्रसिध्द कवी अस्लम मिर्झा यांनी कवी प्रशांत असनारे यांच्याशी संवाद साधत ‘मीच माझा मोर’ हा काव्यसंग्रह उर्दूत अनुवदित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 2015 पासून सातत्याने या संग्रहातील कवितांवर चर्चा करताना मिर्झा यांनी खूप मेहनत घेतली. मराठीतील भावना, आशयाचा अभ्यास करून मिर्झा यांनी उर्दू अनुवाद केला. ‘मीच माझा मोर’ या काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘विशाखा’ पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा मानाचा पुरस्कारासह एकूण 11 पुरस्कार मिळाले होते. 2017 साली उर्दूत अनुवादानंतर देश-विदेशात हा कवितासंग्रह पोहोचला आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि माणसा-माणसांमधील संंबंध हाच या कवितासंग्रहाचा गाभा आहे.


कविता ही माणसाला अधिक संवेदनशील आणि सुसंस्कृत बनवित असते. आंतरिक करुणेचा गंध जेव्हा कवितेतून दरवळतो तेव्हा त्याचा परिमळ वातावरणात पसरून काव्यरसिकाला काही काळ तरी आपले दुःख विसरायला भाग पाडतो. अशाच प्रकारची अनुभूती कवी प्रशांत असनारे यांच्या कविता वाचून, अनुभवून वाचकाला येते. 
‘मीच माझा मोर’ या काव्यसंग्रहाने मराठी कवितेच्या प्रांतात आपला वेगळा पण अविट ठसा प्रशांत असनारे यांनी उमटविलाच मात्र ‘मोरपंख’ या उर्दू अनुवादानाने देशोदेशीच्या सीमाही ओलांडल्या आहेत.
आपल्या मनातील मनस्वी मोराला बेभान होऊन नाचण्यासाठी आनंदाचे असो अथवा दुःखाचे दोन थेंब पाणी पुरेसे असते, असे सांगणाऱ्या या कवीकडे कवितेला न्याय देणारी शब्दरत्नांची ताकद आहे. त्यामुळे कवी अगदी सहज व्यक्त होतो. अनुभूतीच्या पातळीवर व्यक्तीकडून समष्टीकडे घेऊन जाणाऱ्या या संग्रहातील कविता काळजावरून हळुवारपणे मोरपीस फिरवितात.कवितांचा आस्वाद घेताना वाचकालाही आपणच मोर झाल्यासारखे वाटते.

ये हृदयीचे ते हृदयी
अकोल्यातील कवी प्रशांत असनारे आणि औरंगाबाद येथील उर्दू कवी अस्लम मिर्झा यांचा मीच माझा मोर या कविता संग्रहाबद्दल सातत्याने फोनवर संवाद झाला. मात्र, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळेपर्यंत त्यांची अजूनही प्रत्यक्ष भेट झाली नसल्याचे कवी प्रशांत असनारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com