esakal | मोदी सरकारची डाळ शिजेल केव्हा अन् पोटात जाईल केव्हा! लाखो लोकांना प्रतिक्षाच
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Modi government's dal will be cooked when it will go to the stomach! Millions of people are waiting

टाळेबंदीच्या काळात मोदी सरकारने रास्तभाव दुकानांमधून गरिबांना मोफत तांदुळाचे वाटप केले. त्यानंतर गरिबांना मोफत डाळींचे सुद्धा वाटप करण्याची घोषणा केली होती.

मोदी सरकारची डाळ शिजेल केव्हा अन् पोटात जाईल केव्हा! लाखो लोकांना प्रतिक्षाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : टाळेबंदीच्या काळात मोदी सरकारने रास्तभाव दुकानांमधून गरिबांना मोफत तांदुळाचे वाटप केले. त्यानंतर गरिबांना मोफत डाळींचे सुद्धा वाटप करण्याची घोषणा केली होती. परंतु मोदी सरकारची ही मोफतची डाळ रेशन दुकानांमधून घराघरात पोहोचलीच नाही. त्यामुळे रेशनची डाळ केव्हा शिजेल व गरिबांच्या पोटात जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

कोरोना विषाणूने जगभरात आपलं जाळं पसरवलं आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात 31 मेपर्यंत टाळेबंदी (लॉकडाउन) जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. टाळेबंदीच्या या काळात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे. त्यानंतर आता शासनाने अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना (प्रती कार्ड) एक किलो मोफत डाळीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे रेशन दुकानांमधून आता तूरडाळ व हरभरा डाळीचे वाटप करण्यात येणार आहे. एप्रिल, मे व जून महिन्यांसाठी सदर डाळीचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यातील दोन लाख 64 हजार 492 लाभार्थ्यांना सदर निर्णयाचा लाभ मिळेल. ताळेबंदीत घरातच असलेल्या लाखो नागरिकांना मोफत डाळ मिळणार असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता होती. परंतु मे महिन्याची 20 तारीख ओलांडल्यानंतर सुद्धा नागरिकांना अद्याप डाळ मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.

अशी केली होती मागणी
अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत डाळ देण्यासाठी तीन हजार क्विंटल डाळीची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे केली आहे. सदर मागणी एक महिन्यासाठी आहे. हरभरा किंवा तूरडाळ लाभार्थ्यांला देण्यात येईल.

डाळ उपलब्ध; वाटप रखडले
जिल्ह्यातील गोदामात तीन हजार 80 क्विंटल तूर व चना डाळ उपलब्ध झाली आहे. परंतु रेशन दुकानदारांना डाळींचे वाटप करण्यात आले नाही. परिणामी लाभार्थ्यांना सुद्धा मोफत डाळीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

असे आहेत जिल्ह्यातील कार्डधारक

  • अंत्योदय कार्डधारक - 43 हजार 707
  •  प्राधान्य कार्डधारक - 2 लाख 20 हजार 785

अंत्योदय व प्राधान्य कार्डधारकांसाठी रेशनची डाळ प्राप्त झाली आहे. लाभार्थ्यांना लवकरच डाळींचे वाटप करण्यात येईल.
- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला 

loading image
go to top