Video : शिक्षणासाठी गेले अन् कोरोनामुळे अडकले... परत येण्याची झाली पंचाईत

मनोज भिवगडे
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना विषाणूमुळे फिलिपाईन्समध्ये एकट्या मनिला शहरातच १४६ जण बाधित झाले आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे. मेट्रो मनिला शहर शटडाऊन झाले असून, तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील १७ विद्यार्थी मनिलामध्ये अडकून पडले आहेत. त्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे.

अकोला : कोरोना विषाणूमुळे फिलिपाईन्समध्ये एकट्या मनिला शहरातच १४६ जण बाधित झाले आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे. मेट्रो मनिला शहर शटडाऊन झाले असून, तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील १७ विद्यार्थी मनिलामध्ये अडकून पडले आहेत. त्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी अकोला, बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी फिलिपाईन्समध्ये आहेत. गेले तीन ते चार वर्षांपासून हे विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. मेट्रा मनालीमधील आमा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश असून, महाराष्ट्रातील १७ पेक्षा अधिक विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे फिलिपाईन्समध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. फुड मॉलसह खाद्य पदार्थाची दुकाने व हॉटेल गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसाठी खानावळी सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी मनिलामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडणेही कठीण झाले आहे.

अनेकांचा व्हिझा संपला
अकोल्यासह राज्यातील १७ पेक्षा अधिक विद्यार्थी फिलिपाईन्समध्ये मनिला शहरात अडकून पडले आहेत. त्यांच्यातील बहुतांश जणांचा व्हिसा संपला आहे. त्यांना व्हिसा नुतनिकरणासाठी भारतात जाण्याबाबत तेथील सरकारने नोटीस दिली आहे. कोरोनामुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची तेथील सरकारने मदत सुरू केली आहे. त्यांच्याकडून फार्म भरून घेतले असून, लवकरच या विद्यार्थ्यांना व्हिसा नुतनिकरण करून घ्यावा लागणार असल्याची माहिती अकोल्यातील विद्यार्थ्याने ‘सकाळ’शी बोलताना दिली.

भारतात परतण्याबाबत संभ्रम
मनिलामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या १५० पेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी भारतात परत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र भारत सरकारने दुपारी ३ वाजतानंतर विदेशातून येणाऱ्या विमानांना विमानतळावर उतरण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मनालीतून भारतात परण्यासाठी तिकिट आरक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढला आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांचे भारतात परतण्यासाठी मंगळवारी (ता.१७) तिकिट बूक झाले होते. मात्र भारत सरकारच्या निर्णयाने हे विद्यार्थी तेथेच अडकून पडले आहेत.

... तर खाण्यापिण्यचेही होतील हाल!
फिलिपाईन्समध्ये कोरोना विषाणूमुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली असून, मेट्रो मनिलामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांना १४ एप्रिलपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून, हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीचे दुकानेही बंद ठेवली जात आहे. बाहेर कुठेही फिरण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना खाण्यासाठीही काही मिळणार नाही, अशी परिस्थिती असल्याची आपबिती मनिलामध्ये अडकून पडलेल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली.

भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा
फिलिपाईन्समध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिसा संपले आहेत. त्यांना व्हिसा नुतनिकरणासाठी भारतात परतण्याबाबत तेथील सरकारने नोटीस बजावल्या आहेत. मात्र कोरोना विषाणूमुळे विमान प्रवासात येत असलेल्या अडचणीने विद्यार्थी मनिलामध्येच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola : More than 17 students from across the state are trapped in the Philippines