भाजप फेकू सरकार!: हार्दिक पटेल

Hardik Patel
Hardik Patel

महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार

अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रावारी (ता. 23) अकोला येथे केली.

स्वराज्य भवन येथे विदर्भ युथ फोरमतर्फे आयोजित शहीद दिनानिमित्त एल्गार मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे तर अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर ढोणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश भारसाकळे, राजस्थानचे हिंम्मत गुजर, अमित पटेल, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर, सुभाष सातव, मदन भरगड, बबनराव चौधरी, हिदायत पटेल, श्रीकांत पिसे पाटील, तुकाराम बिरकड, डॉ. आशा मिरगे, महादेव भुईभार, अविनाश देशमुख, डॉ. अभय पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक विदर्भ युथ फोरमचे मंगेश भारसाकळे यांनी केले. हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रातील पहिल्याच सार्वजनिक सभेत शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी एल्गार पुकारला. अन्नदाता का आत्महत्या करतो आहे, यावर मंथन करण्याची गरज आहे. युवक, शेतकऱ्यांनी आंदोलन केले तर त्यांच्या छातीवर गोळी मारल्या जाते. आपण चुकीचा नेता निवडल्याचा साक्षात्कार आपणास होतो. जो नेता आपल्या बद्दल विचार करतो, त्याच नेत्याला परत निवडून आणण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. या देशात परिवर्तन आणण्याची आवश्‍यकता आहे. आत्महत्या रोखण्यासाठी किंवा युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाकडे कुठलाच फॉर्म्युला नाही. ज्या सरकारकडे उपाययोजना नाहीत, त्या सरकारला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. २०१४ च्या निवडणुकीत याच भाजपने वेगळ्या विदर्भाची भाषा केली होती. परंतु, आज चार वर्ष झाली तरी वेगळा विदर्भ होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या ही फॅशन होत चालली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या का करावी, शेतकरी दिवसेंदिवस कमजोर होत चालला आहे. त्याला कमजोर दाखविल्या जात आहे. शेतकऱ्यांना गरीब दाखविणाऱ्या या सरकारला खाली खेचले पाहिजे, अशा पद्धतीने भाजपवर टीका करीत हार्दिक पटेल यांनी राम मंदीर, सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे वचन अजूनपर्यंत सरकारने पूर्ण केले नाही. स्वप्न दाखविणाऱ्या या सरकारने युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना आत्मसन्मान देण्याचा कुठलाच प्रयत्न केला नाही. देशाला तोडण्याची स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत शेतकरी भाववाढीसाठी हडताल का करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. जे ऑटोचालक २५ पैशांनी इंधनवाढ झाल्यावर हडताल करतात तसे शेतकरी का करीत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करीत विदर्भातील शेतकऱ्यांनी जागृक होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी मनपातील करवाढीकडेही लक्ष वेधले.

नागपूर दीक्षा भूमीचे!
नागपुरातील दीक्षा भूमीवर पहिल्यांदाच गेलो. दीक्षा भूमीतील गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पाहुण धैर्य आणि उर्जा देणारी ही भूमी असल्याचा साक्षात्कार झाला. तेव्हा लक्षात आले की नागपूर हे संघाचे नसून तर दीक्षा भूमीचे आहे, असे म्हणून हार्दिक पटेल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संघ, भाजपवर टीकास्त्र सोडले.

आता राजकीय गुंडगिरी करेल : गुलाबराव गावंडे
गुजरातच्या २४ वर्षीय हार्दीक पटेल याने देशाचा युवक जागृत केला आहे. या सरकारने नोकऱ्या कमी केल्यात. राज्यकारभार कोणी करावा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी ब्राम्हण आणि क्षत्रीय यावर भाष्य करीत मी जाती विरोधी नसल्याचेही स्पष्टीकरण केले. तर व्यवस्थेविरोधात असल्याचे स्पष्ट केले. ब्राम्हण जेव्हा राजकारणात उतरला तेव्हा देशाचा ऱ्हास झाला असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत मला गुंड म्हणत होते. आता गुंडगिरी करेल, मुस्लीम, बौद्धांना सोबत घेऊन राजकीय गुंडगिरी करेल, असे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे म्हणालेत.

भगतसिंगांसारखी उर्जा युवकांमध्ये हवी : संग्राम गावंडे
२३ वर्षांच्या क्रांतीकारी भगतसिंग यांना इंग्रज सरकारने सायंकाळी ७.३३ मिनीटांनी फाशी दिली. जगातील ही सायंकाळची पहिली फाशी आहे. इतकी दहशत भगतसिंग यांची होती. अशीच उर्जा २४ वर्षांच्या हार्दिक पटेल यांच्यामध्ये आहे. तीच उर्जा आजच्या युवकांमध्ये असणे गरजेचे असल्याचे मत स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आजचा युवक बेरोजगार आणि शेतकरी परेशान झालेला असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले.

सभेकडे सर्वांचे लक्ष लागले : डॉ. ढोणे
विदर्भ फोरमच्या एल्गार मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमुळे दिल्लीतून या सभेसंदर्भात माहिती घेतल्या जात आहे. हे सरकार युवक आणि शेतकरी विरोधी आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा अहंकार येणाऱ्या २०१९ च्या निवडणूकीत हाणून पाडायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सभेचे अध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे यांनी व्यक्त केले.

पोलिसांचा कडक पहारा
हार्दिक पटेल यांना वाय प्लस सुविधा असल्यामुळे पोलिसांचा मेळाव्याभोवती तथा परिसरात कडक पहारा होता. संशयितांची चौकशी करण्यात येत होती. तर मंचावर बसणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची यादीही तयार होती. त्यानुसारच पाहुण्यांना मंचावर आमंत्रित करण्यात येत होते. ती यादी पोलिसांकडेही होती. यादीनुसारच मंचावर पाहुण्यांना सोडण्यात आले. गोंधळ होत असल्याचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांच्याशी किंचित वाद घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com