अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वत्र विविध उपाययोजना होत असतांना तुरुंगांमध्ये बंदीवासात असणाऱ्या बंदीजनांचे ही या विषाणू संसर्गापासून रक्षण व्हावे यासाठी तुरुंग प्रशासन विविध उपाययोजना करुन काळजी वाहतांना दिसत आहे. कैदी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तसेच एकूणच तुरुंग आवारातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. या शिवाय येथील कैद्यांकडून कापडी मास्क शिवून घेण्याचे कामही कारागृहात सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही हे मास्क देण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.
यासंदर्भात अकोला मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक ए.एस.सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा अकोला मध्यवर्ती कारागृहात 453 कैदी आहेत. त्यात 398 पुरुष व 55 महिला कैदी आहेत. येथे एका अंडासेलसह चार बॅरेक्स आणि एक महिलांसाठीचे बॅरेक आहेत. शिवाय एक दवाखानाही आहे. बंदीजनांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांनाही आत येण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच काय पण न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या कैद्यांच्या न्यायालयात हजेरी देण्यासाठी, न्यायालयीन कामकाजासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सचा वापर केला जात आहे.
प्रत्येक कैद्याला मास्क देण्यात आला आहे. त्यासाठी लागणारे मास्क हे स्वतः कैदी बनवत आहे. कैद्यांनी बनवलेले मास्क शासकीय कर्मचारी, पोलिसांनाही देण्यात येणार असल्याचे अधिक्षक सदाफुले यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क देण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात त्यांना हात धुण्यासाठी साबण व पाण्याची सोय आहे. यामुळे सर्व कैद्यांची प्रकृती उत्तम आहे. कैद्यांच्या दैनंदिन वापराचे कपडे, अंथरुण आदी कपडे धुण्यासाठी गरम पाणी व साबण इत्यादीची व्यवस्था करुन धुवून उन्हात वाळवून मग पुन्हा वापरता येत आहेत. एकाच आवारात अधिक व्यक्ती राहत असल्याने, ही खबरदारी राखली जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.