जिल्हा पोलिस अधिक्षक हाजीर हो...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

जिल्हातून 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर 2019 या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 35 तरूणी बेपत्ता झाल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांनी कोणत्याही प्रकराचे ठोस पाऊल न उचलल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्हा पोलिस अधिक्षकांना समन्स बजावून 15 जानेवारी रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. 

अकोला : जिल्हातून 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर 2019 या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 35 तरूणी बेपत्ता झाल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांनी कोणत्याही प्रकराचे ठोस पाऊल न उचलल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्हा पोलिस अधिक्षकांना समन्स बजावून 15 जानेवारी रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. 
जिल्ह्यातील विविध भागात राहणाऱ्या 35 मुली दोन महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी मुलीचा शोध घेण्याकरिता विशेष प्रयत्न केले नाहीत. पोलिस ठाण्यात वारंवार चकरा मारूनही मुलगी मिळाली नसल्याने किरण ठाकरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीला त्यांच्या समक्ष हजर करण्याची मागणी केली. तसेच बेपत्ता मुलींची आकडेवारी न्यायालयात सादर करून अकोला पोलिस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोपही केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायमूर्ती सुनील शुक्रे, मिलींद जाधव यांनी तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेवून न्यायालयात हजर होण्यास सांगितले होते. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीमुळे तपास अधिकारी न्यायालयात हजर झाले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी न्यायालयात केस डायरी सुद्धा सादर केली नाही. निवडणुकीमुळे हजर न राहणे ही बाब न्यायालयाने मान्य केली परंतु केस डायरी पाठविण्यात न आल्याने अकोला पोलिसांना फटकारण्यात आले. अखेर 15 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना न्यायालयात हाजिर होण्याचे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola sp in high court