अकाेल्याच्या साक्षी गायधनेने रौप्य पदकावर कोरले नाव

प्रवीण खेते
शुक्रवार, 18 मे 2018

यूथ एशियन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातून एकादा खेळाडू जाण्याची ही पहिलीच वेळ हाेती. त्यामुळे साक्षीची जबाबदारीही वाढलेली हाेती. पण आतापर्यंतच्या प्रवासात ढाल म्हणून उभी असलेली आई अन् प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण लक्ष खेळाकडे असल्याचं साक्षीने 'सकाळ'शी बाेलताना सांगितले. 

अकाेला : बँकाॅक (थायलँड) येथे झालेल्या 'एशियन युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप'मध्ये अकाेल्याच्या साक्षी गायधनेने रौप्य पदकावर आपले नाव काेरले. महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने एशियन युथ चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकाविल्याची ही पहिलीच वेळ आहे. एशियन चॅम्पियनशिपनंतर साक्षी पहिल्यांदाच अकाेल्यात आली. यानिमित्ताने शुक्रवारी (ता.१८) साक्षीने ‘सकाळ’ ला विशेष मुलाखत देत, पुढचे ध्येय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे असल्याचे सांगितले.

हरियाणातील राेहतक येथे २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ७५-८१ किलाे वजन गटात साक्षीने सुवर्ण पदकावर नाव काेरले अन् बँकाॅक येथे हाेणाऱ्या युथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये जागा पक्की झाली. तत्पूर्वी साक्षीची निवड इंडिया कॅम्पसाठी झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण अन् त्यानंतर मुक्क्यांचा दम दाखवण्यासाठी साक्षीने थेट बँकाॅक (थायलँड) गाठले.

यूथ एशियन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातून एकादा खेळाडू जाण्याची ही पहिलीच वेळ हाेती. त्यामुळे साक्षीची जबाबदारीही वाढलेली हाेती. पण आतापर्यंतच्या प्रवासात ढाल म्हणून उभी असलेली आई अन् प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण लक्ष खेळाकडे असल्याचं साक्षीने 'सकाळ'शी बाेलताना सांगितले. 

स्पर्धेतील पहिला राऊंड हा चीन साेबत झाला. या राऊंडमध्ये साक्षीनं अगदी सहज विजय मिळवला, पण उपांत्यपूर्व फेरीत कजाकिस्तानं चांगलीच टक्कर दिली. या फेरीत ४-१ च्या फरकानं अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र, त्याचवेळी हाताला दुखापत झाल्याने अंतिम फेरीमध्ये संघर्ष करावा लागला. असे असले, तरी रिंगणाबाहेरून येणाऱ्या ‘साक्षी- साक्षी’ या आवाजामुळे आत्मविश्वास वाढला. मात्र, सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण हाेऊ न शकल्याची साक्षीने खंत व्यक्त केली. 

जिंकण्याची जिद्द अजूनही कायम ठेवत, साक्षीनं पुढचं ध्येय हंगेरीत हाेणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक असल्याचे साक्षीने यावेळी सांगितले.

थाेडक्यात साक्षीची कामगीरी

२०१४ पासून बॉक्सिंग खेळायला सुरवात केली. आतापर्यंत साक्षी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली. यामध्ये १० सुवर्ण, १ रौप्य आणि २ कास्य पदकांची कमाई केली. साक्षीनं २०१७ मध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत सलग पाच सुवर्ण पदक पटकावले, हे विशेष.

Web Title: Akolas Sakshi gaydhane got medal