चंद्रपूरकर म्हणतात, दे दारू.... ओ मेरे भैया दे दारू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील दारूबंदीच्या चांगल्या, वाईट परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निर्देशानुसार समीक्षा समिती गठित करण्यात आली.

चंद्रपूर : दारूबंदी समीक्षा समितीमार्फत जिल्ह्यभरातून व्यक्तिगत तसेच नोंदणीकृत संस्थांकडून मागण्यात आलेल्या लेखी अभिप्रायाचा अक्षरशः पाऊस उत्पादन शुल्क कार्यालयात पडला. तब्बल दोन लाख 82 हजार 412 निवेदन प्राप्त झाली. यातील केवळ 20 हजार 485 जणांना दारूबंदी कायम राहावी, असे वाटत आहे. दोन लाख 61 हजार 954 निवेदन जिल्ह्यात दारूबंदी नको या मताची आहेत. अभिप्राय सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. 25) तब्बल एक लाख 25 हजार निवेदन प्राप्त झाली. 

मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील दारूबंदीच्या चांगल्या, वाईट परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निर्देशानुसार समीक्षा समिती गठित करण्यात आली. नऊ सदस्यीय या समितीत केवळ शासकीय अधिकारी आहेत. मात्र, दारूबंदीसंदर्भात वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि व्यक्तिगत पातळीवर आपले म्हणणे मांडण्याची संधी जिल्हावासींना देण्यात आली. 

येथील उत्पादन शुल्क कार्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा व्यक्तिगतरीत्या निवेदनातून दारूबंदीसंदर्भात नागरिकांना 10 फेब्रुवारीपासून मत मांडण्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली. 25 फेब्रुवारी शेवटचा दिवस होता. या काळात दोन लाख 78 हजार 981 नागरिकांनी व्यक्‍तिश: निवेदन आणून दिली. तीन हजार चारशे निवेदन या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्राप्त झाली आहेत.

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी एकूण दोन लाख 82 हजार 412 निवेदन प्राप्त झाली. यातील केवळ 20 हजार 458 निवेदन दारूबंदी जिल्ह्यात कायम राहावी, या बाजूची आहे. दोन लाख 61 हजार 954 नागरिकांनी स्पष्ट विरोध केला. निवेदन आत समीक्षा समितीसमोर जाणार आहे. त्याचा अहवाल पालकमंत्री वडेट्टीवार यांना दिला जाईल. त्यानंतर पालकमंत्री तो अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडतील. दारूबंदीसंदर्भात जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह होते. त्याचे प्रतिबिंब या अभिप्रयातून उमटले आहे. 

डाॅनच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा

गत पाच वर्षांपासून उत्पादन शुल्क कार्यालयात शुकशुकाट असायचा. मात्र, मागील पंधरा दिवसांत या कार्यालयातील वर्दळ वाढली. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक आपला अभिप्राय मांडण्यासाठी या कार्यालयात पोहोचले. मध्यंतरी दारूविक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांनीही निवेदनांचा गठ्ठाच आणून दिला. त्यानंतर दारूविक्रेतेही सक्रिय झाले. सोबत सामजिक संस्थांनीही आपल्या परीने निवेदन दिलीत. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. अभय बंग यांच्या मुक्तीपथ या संस्थेने 6 हजार 970 निवेदन दिली आहे. शेवटच्या दिवशी या कार्यालयात निवेदन आणून देण्यासाठी प्रचंड गर्दी होती. तब्बल 1 लाख 25 हजार निवेदन शेवटच्या दिवशी प्राप्त झाली. 
 

तासाला 2 हजार 941 निवेदन

 
10 फेब्रुवारीपासून दारूबंदीसंदर्भात अभिप्राय स्वीकारणे सुरू झाले. 25 फेब्रुवारी शेवटचा दिवस होता. याकाळात तीन दिवस कार्यालयाला सुट्टी होती. एकूण 12 दिवस कार्यालयीन कामकाज झाले. या काळात दररोज आठ दिवस निवेदन स्वीकारण्याचे काम सुरू होते. 2 लाख 82 हजार 412 निवेदन प्राप्त झाली. याचा अर्थ तासाला 2 हजार 961 निवेदनांचा पाऊस उत्पादन शुल्क कार्यालयावर पाऊस पडला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol ban News in Chandrapurkar District