चंद्रपुरातील "त्या' प्रकरणात पाचही आरोपींची निर्दोष सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

चंद्रपुरातील बहुचर्चित चार महिन्यांच्या मुलीच्या विक्री प्रकरणातील पाच आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. इर्शाद शिवजी, त्यांची पत्नी डॉ. सिद्दीका शिवजी, सुमीत मेश्राम आणि त्यांची पत्नी तृप्ती मेश्राम यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.

चंद्रपूर : सन 2011 मध्ये हे प्रकरण उघडकीला आले. आरमोरी येथील संदीप आडे या व्यक्तीने येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. शिवजी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मुलीला भरती करून तिला सोडून गेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली.

 

रामनगर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. तेव्हा डॉ. ईशाद अली अकबर अली शिवजी यांनी चंद्रपुरातील सुमीत मेश्राम याला चार महिन्यांची ही बालिका पैशाच्या मोबदल्यात दिल्याचे समोर आले.

 

मात्र, आठ महिन्यांत मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे समोर आले. डॉ. शिवजी यांनी आपली फसवणूक केली अशा समजुतीवरून मेश्राम यांनी चार सप्टेंबर 2011 रोजी रात्री दीड वाजता खोटे नाव आणि पत्ता लिहून उपचाराच्या नावावर मुलीला डॉ. शिवजींच्या रुग्णालयात सोडून दिले, असे पोलिस तपासात समोर आले.

मुलगी घरीच जन्माला आल्याचा बनावट दाखला

मुलगी घरीच जन्माला आली, असा नगिनाबागचे तत्कालीन नगरसेवक देशक खोब्रागडे यांनी दाखला दिला. तो दाखलासुद्धा बनावट असल्याचे पोलिसांना आढळले. चौकशीअंती डॉ. ईशाद शिवजी आणि सुमीत मेश्राला अटक करण्यात आली. देशक खोब्रागडे यांनी अटकपूर्व जामीन मिळविला. डॉ. सिद्दीका शिवजी आणि तृप्ती मेश्राम पोलिसांच्या हाती लागल्या नाही.

असे का घडले? : माणिकगड कंपनीने लुटली गरीब शेतक-याची शेतजमीन, आता आली भीक मागण्याची वेळ

एकूण 17 साक्षीदार तपासले

या प्रकरणी 15 नोव्हेंबर 2011 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. डॉ. खोब्रागडे यांची दाखल्यावरील स्वाक्षरी, प्रिस्क्रिपशनवरील डॉ. शिवजींचे हस्ताक्षर यांचा अहवाल फोरेन्सिक लॅबमधून निगेटिव्ह आला. याप्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर उपरोक्त पाचही जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

वरिष्ठ न्यायालयात अपील करणार

सरकारी वकील ऍड. संदीप नागापुरे यांनी निकालपत्र वाचल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेऊ असे "सकाळ'शी बोलताना सांगितले. आरोपींची बाजू ऍड. खजांजी, ऍड. सुनील हस्तक आणि सुनील पुराणिक यांनी मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All five accused acquitted in "those" cases in Chandrapur