अमिताभ पत्रकार परिषदेतून उठले आणि...

amitabh
amitabh

नागपूर : मोहनसिंहने दादर एक्‍सप्रेसचे तिकीट काढून दिल्यामुळे अमिताभ दुसऱ्या दिवशी "आनंद'च्या शूटिंगला वेळेत पोहोचले. पुढे "आनंद' आणि "जंजीर'ने अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला होता. दरम्यान, मोहनसिंह आणि अमिताभ यांच्या नागपुरात आणि मुंबईत दोन-तीन धावत्या भेटी झाल्या. पण, सत्तरच्या दशकाअखेर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांची विद्यापीठ मैदानावर पत्रकार परिषद सुरू होती. पत्रकारांच्या मागे उभे असलेल्या मोहनसिंहवर अमिताभ यांची नजर पडली. ते पत्रकार परिषदेतून उठले आणि थेट मोहनसिंहची गळाभेट घेतली. 

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण नागपुरात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. "झुंड'च्या निमित्ताने मात्र, पाच दशकांपूर्वी हुकलेला योग चालून आला आहे, हेही महत्त्वाचे. 1970 मध्ये "परवाना'चे चित्रीकरण नागपुरात करण्याचा प्लान रद्द झाल्यानंतर अमिताभ यांनी एक दिवस नागपूरची सफर केली. परत जाताना मोहनसिंहच्या प्रयत्नांमुळे रेल्वेमध्ये कशीबशी जागा मिळाली. त्यानंतर एकदा मुंबईच्या विमानतळावर संपूर्ण बच्चन कुटुंबाची भेट झाल्याचे मोहनसिंह सांगतात. त्यावेळी मोहनसिंहला नागपूरची संत्री घेऊन घरी येण्याचे निमंत्रण अमिताभ यांनी दिले. पुढे अमिताभ, रेखा आणि अमजद खान एकत्र नागपुरात आले होते. तेव्हा मोहनसिंह यांनी धावती भेट झाली.

"जंजीर' आणि "आनंद'च्या यशामुळे अमिताभ यांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊ लागली होती. काही वर्षांनी "शोले'मुळे अमिताभ यांच्या स्टारडममध्ये कमालीची भर पडली. त्यानंतरच्या काळात अमिताभ आणि अमजद खान एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असताना विद्यापीठ मैदानावर दोघांची पत्रकार परिषद झाली. मोहनसिंह तिथे पोहोचले आणि पत्रकारांच्या मागे उभे झाले. पत्रकार परिषदेत बोलताना अचानक अमिताभ यांची नजर पगडी घातलेल्या सरदार मित्रावर पडली आणि ते तसेच पत्रकार परिषदेतून उठले आणि मोहनसिंहकडे आले. त्यांची गळाभेट घेतली आणि अमजद खानलादेखील बोलावून घेतले. अमिताभ यांनी त्या दोघांची ओळख करून दिली आणि तेव्हाचे देशपांडे नावाचे ज्येष्ठ छायाचित्रकार यांना फोटो काढण्याची विनंती केली. हे छायाचित्र आजही जुन्या फ्रेममध्ये मोहनसिंह यांच्या इतवारीतील घरात सुरक्षित आहे. 

अमिताभ यांच्यावर ब्लॅंकेट, चादर उधार 
दादर एक्‍स्प्रेसने मुंबईला जाताना अमिताभ यांच्यासाठी मोहनसिंह यांनी शेर-ए-पंजाब हॉटेलच्या मालकाकडून ब्लॅंकेट आणि चादर आणले. अमिताभ यांनी मुंबईत पोहोचल्यावर काही दिवसांनी मोहनसिंह यांना पत्र लिहिले आणि त्यात याचा आवर्जुन उल्लेख केला. "हे सामान परत करण्यापेक्षा तुम्हा लोकांची आठवण म्हणून जपून ठेवायला आवडेल', या वाक्‍याने अमिताभ यांनी पत्राचा शेवट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com