अमरावती : कोविडच्या दुसऱ्या लाटेत रोखले मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid death who

अमरावती : कोविडच्या दुसऱ्या लाटेत रोखले मृत्यू

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकीकडे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच दुसरीकडे अमरावतीच्या एसआरपीएफने योग्य उपाययोजना करीत कोरोनाशी दोन हात केले. एसआरपीएफचे कमांडंट हर्ष पोद्दार यांच्या अभिनव कार्यपद्धतीने हे शक्य झाले.

अमरावती शहर हे एकमेव असे शहर आहे की येथे कोविडची दुसरी लाट ही भारतात सर्वप्रथम सुरू झाली होती. त्यापासून एसआरपीएफच्या जवानांना सर्वांत जास्त धोका होता. कारण त्यांना राज्याबाहेरील निवडणुकांसाठी तसेच संपूर्ण राज्य आणि देशातील नक्षल विरोधी अभियानासाठी बंदोबस्ताकरिता सर्वत्र तैनात केले जात होते. तसेच कोविड बंदोबस्तासाठी सुद्धा त्यांना तैनात करण्यात येत होते. अशाप्रकारची गंभीर परिस्थिती असूनही अमरावती बटालियनमध्ये एकही एसआरपीएफ पोलिस अंमलदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकही मृत्यू झाला नाही. हे सर्व कमांडंट आयपीएस हर्ष पोद्दार यांनी सुरू केलेल्या विशेष कार्यपद्धतीमुळे शक्य झाले.

अमरावती एसआरपीएफ ग्रुप नऊमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य कार्यपद्धतीमध्ये पोलिस अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के लसीकरण, तीन स्तरीय सार्वजनिक अंतर ठेवण्याची यंत्रणा आणि निदान चाचण्या या मुख्य गोष्टींचा अवलंब करण्यात आला. कोविडमध्ये मृत्यू प्रामुख्याने चार कारणामुळे होतो. न्युमोनिया, साईटोकिन वादळ, रक्त गोठणे आणि अवयव निकामी होणे ही कारणे होती. त्यामुळे एसआरपीएफमध्ये कोविड पॉझिटिव्ह झालेल्या लोकांमध्ये यासर्व लक्षणांसाठी नियमित प्रकारे चाचण्या घेण्यात येत होत्या, त्यामुळे त्यांची प्रकृती अचानकपणे गंभीर झाली नाही. या विशेष कार्यपद्धतीमुळे एसआरपीएफ अमरावती ग्रुप नऊमध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकाही पोलिस अंमलदार किंवा त्यांचे कुटुंबीय यांचा मृत्यू झाला नाही. नियमितपणे सेवा बजावून एसआरपीएफच्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यात आली.

जागतिक स्तरावर झाली नोंद

या विशेष कार्यपद्धतीला अमेरिकेतील फ्लेचर फोरम ऑफ वर्ल्ड अफेयर्सने विशेष केस स्टडी म्हणून प्रकाशित केले आहे. फ्लेचर फोरम हे जागतिक शासन आणि धोरणाशी संबंधित मुद्यांवर एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय जर्नल आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव कोफी अन्नान यांच्यासारख्या जागतिक नेत्यांचे कार्य त्यांनी प्रकाशित केले आहे.

Web Title: Amravati Covid Death Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid 19vidarbhadeath