अमरावती : मोकाट कुत्र्याने घेतला चिमुकलीला चावा ; चिमुकली गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

अमरावती : मोकाट कुत्र्याने घेतला चिमुकलीला चावा ; चिमुकली गंभीर जखमी

अमरावती : शहरातील साईनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातल्यामुळे नागरिक हैराण आहेत. शनिवारी (ता. 20) एका सात वर्षांच्या चिमुकलीला मोकाट कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

साईनगर परिसरात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांसह वराहांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना आढळतात. स्थानिक रहिवासी त्यामुळे चांगलेच त्रस्त झालेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे काहींनी तक्रार केली होती. परंतु मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांची सुटका झालेली दिसत नाही. केवळ मोकाट कुत्रेच नव्हे तर मोकाट वराहसुद्धा मोठ्या प्रमाणात या भागात फिरतात. वराहांच्या छोट्या पिलांचा मोकाट कुत्रे पाठलाग करून त्यांना पकडून ठार मारत असल्याचे दिसून येते. परिसरात काही घरांचे बांधकाम सुरू असून, त्याठिकाणी रखवालदार म्हणून सागर वानखडे हे पत्नी, मुलगा व लहान मुलीसह शेजारीच झोपडीत राहतात. त्यांची मुलगी सुहानी झोपडीसमोर सकाळी बसली होती.

हेही वाचा: पुणे : सकाळी गैरसोय; दुपारी दिलासा

तेवढ्यात मोकाट वहारांचा पाठलाग करीत काही कुत्रे येथे आले. त्यापैकी एकाने घरासमोर खेळणाऱ्या सुहानी वानखडे (वय सात वर्षे) या मुलीचा हात तोंडात पकडून पंधरा ते वीस फुटांपर्यंत फरफटत नेले. चिमुकली जिवाच्या आकांताने ओरडत होती. नागरिकांपैकी काहींनी हा प्रकार बघितला. मुलीला ओढत नेणाऱ्या कुत्र्याच्या मागे काही जण काठी घेऊन धावले. कुत्र्यापासून चिमुकल्या सुहानीची सुटका केली. तोपर्यंत पायाला व हाताला, अशा चार ते पाच ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला होता. ओढत नेल्याने शरीरावरही बऱ्याच जखमा झाल्याचे दिसून आले. जखमी सुहानीला उपचारासाठी नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मोकाट वराह व कुत्र्यांच्या झुंडीपासून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी येथील रहिवासी प्रवीण मळसणे यांनी केली.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कठीण

परिसरात उपद्रव घालणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे ही बाब प्रशासनाला शक्य झाली नाही. अशा कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडले तरी ती त्याच परिसरात पुन्हा येतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. शिवाय मोकाट वराहांचा व्यवसाय करणारेही मोकाट वराहांना आवरू शकले नाहीत.

loading image
go to top