अमरावती : २५ वर्षांनंतर ते आले शाळेत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbha

अमरावती : २५ वर्षांनंतर ते आले शाळेत..

चांदूर : शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९५ च्य बॅचच्या विद्यार्थांनी तब्बल २५ वर्षांनंतर शाळेला भेट दिली. त्यांनी रौप्य महोत्सव सोहळा साजरा करीत गत आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करीत शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ५५ हजार रुपये किमतीचा आरओ प्लांट भेट दिला.

१९९५ मध्ये शिक्षण घेतलेले व आज विविध पदांवर शासकीय, खासगी ठिकाणी नोकरीला असलेले किंवा व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता झालेले सर्व मित्र चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेत एकत्र आले. वर्गखोलीत बेंचेसवरच बसून विद्यार्थ्यांसारखा अनुभव घेतला. मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.

हेही वाचा: शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना का आवडतो कॅनडा? जाणून घ्या

वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शालेय जीवनातील अनेक आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला. शिक्षणामुळेच खरंतर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो, अशा भावना काहींनी व्यक्त केल्या. इतरही माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन आवश्यक ती मदत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थी देशाच्या विविध भागातून या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवर्जून आले होते. काही माजी विद्यार्थी परदेशात असल्याने किंवा येऊ न शकल्याने त्यांनी ऑनलाइन हजेरी लावून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. आयोजनासाठी माजी विद्यार्थी विशाल खंडार यांनी विशेष प्रयत्न केले.

हेही वाचा: मुंबई : बार्टी देणार ९० हजार विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण

यावेळी विशाल खंडार, उज्वल देशमुख, विशाल चोरडिया, अमित भुयार, आशिष पऱ्हाड, संपदा कदम, तृप्ती खाबिया, नीलम जालान, प्रिया जयस्वाल, रश्मी चौधरी, सारिका जैन, सुषमा मंगरूळकर, नीता रुहाटिया, हितेश मालखेडे, सागर धानोडकर, हर्ष कडू, ऋषिकेश सराड, अंबरीश म्हसतकर, राकेश दारले, पंकज ठवकर, अमोल शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. तसेच ऋचा चौधरी, आशिष धामणकर, अनंत नागाने या माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन हजेरी लावली.

loading image
go to top