अमरावती महापालिका झाली लॉकडाउन; दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

बुधवारी रात्री आलेल्या कोरोना चाचणी अहवालात महापौर कार्यालयातील शिपाई व समुदाय विकास कार्यालयातील समाज विकास अधिकारी संक्रमित आढळले आहेत. दोन्ही कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून रजेवर होते हे विशेष.

अमरावती  : महापौर कार्यालयातील शिपाई व समाज विकास विभागातील अधिकारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर महापालिकेतील महापौर कार्यालय व समुदाय विकास विभाग बंद करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून आवगमनावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.3) आयुक्त प्रशांत रोडे यांनी या संदर्भात आदेश काढले. महापौरांसह दोन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

बुधवारी रात्री आलेल्या कोरोना चाचणी अहवालात महापौर कार्यालयातील शिपाई व समुदाय विकास कार्यालयातील समाज विकास अधिकारी संक्रमित आढळले आहेत. दोन्ही कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून रजेवर होते हे विशेष. दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह संपूर्ण परिसर आवागमनासाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. मनपातील मोजके कर्मचारी व अधिकाऱ्यांसह पत्रकारांनाच प्रवेश देण्यात येत आहे. महापौर कार्यालयासह समाज विकास विभाग, नगर सचिव विभाग, बांधकाम विभाग बंद करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी मनपाच्या सर्व परिसरात फवारणी व धुवारणी करून तो निर्जंतुक करण्यात आला. संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक त्या सर्व खबरदारी घेण्यात येत आहेत. 

अवश्य वाचा- चुलत काका-काकूने अल्पवयीन मुलीला नोकरीच्या नावाखाली केले वेश्या व्यवसायास प्रवृत्त

महापौरांसह त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसह समुदाय विकास विभागातील कर्मचारी अशा जवळपास तीस कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही स्वॅब घेण्यात येत आहेत. सर्वांना अहवाल येईस्तोवर होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. 

पंजाब नॅशनल बॅंकही प्रभावित 

महापालिकेच्या इमारतीमधील पंजाब नॅशनल बॅंक या घटनेने चांगलीच प्रभावित झाली आहे. मनपा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने या बॅंकेने ग्राहकांना प्रवेश मर्यादित केला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास होणार असल्याने बॅंकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. 

अधिकारी, कर्मचारी धास्तावले 

महापौरांचा शिपाई व समाज विकास अधिकारी यांच्या संपर्कात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. त्यांनी या दोघांसोबत आपला संपर्क केव्हा व कसा तसेच कितीवेळ आला याची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, संसर्ग उघड होण्याच्या चार दिवसांपूर्वीपासूनच दोन्ही कर्मचारी रजेवर होते, हा दिलासा दिला जात आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वॅब देण्याची तयारीही सुरू केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati Municipal Corporation lockdown; Two employees found corona positive