'अमरावतीतील सर्वच रस्त्यांची दुर्दशा, सांगा आम्ही प्रवास करायचा कसा?'

सुधीर भारती
Saturday, 17 October 2020

रविनगर, छांगाणीनगर, अकोलीकडे जाण्यासाठी एकमेव रवीनगरचा रस्ता आहे. या भागात अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या आहे. त्यातही अरुंद रस्त्यांवर अनेकदा नागरिकांकडून बांधकामाचे साहित्य ठेवण्यात येते

अमरावती : शहरातील वर्दळीच्या मार्गावरून जात असताना नागरिकांना सर्कस करावी लागत आहे. केवळ मुख्य मार्गासोबतच आतील भागातील रस्त्यांचीसुद्धा दुर्दशा झालेली आहे. महापालिका, नगरसेवक तसेच लोकांनी निवडून दिलेले खासदार, आमदारांना नागरिकांचा हा त्रास दिसतोय की नाही? असा सवाल नागरिक करत आहेत. वर्दळीचा जयस्तंभ चौक, राजकमल चौक, समर्थ हायस्कूलसमोरील अर्धवट रस्ता, शिलांगण रोड या सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. 

रविनगर, छांगाणीनगर, अकोलीकडे जाण्यासाठी एकमेव रवीनगरचा रस्ता आहे. या भागात अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या आहे. त्यातही अरुंद रस्त्यांवर अनेकदा नागरिकांकडून बांधकामाचे साहित्य ठेवण्यात येते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. प्रशासनाने तत्काळ रस्त्यांबाबत नियोजन केले पाहिजे, असे व्यावसायिक दत्ता गिरी म्हणाले.

हेही वाचा -दंत महाविद्यालयात लागला बोर्ड : रुग्णांनो, ‘आमच्याकडे ना भूल देण्याचे औषध, ना सर्जिकल ब्लेड, ना...

शिलांगण परिसरातील देवीचा पालखी मार्ग अद्यापही अपूर्णच आहे. वास्तविक या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे, ते अर्धवट आहे. समर्थ हायस्कूल जवळील रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी भूषण पाटणे यांनी केली आहे.

रस्त्यांची कामे टप्प्याटप्याने सुरू करणे गरजेचे -
वास्तविक संबंधित यंत्रणेने एकाचवेळी सर्व रस्त्यांची कामे सुरू न करता ती टप्प्याटप्याने करणे गरजेचे होते. परिणामी आज शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. व्यवसायावर याचा परिणाम होत असून रस्ते बंद असल्यास ग्राहक दुकानात फिरत नाहीत.
-आशीष चाळीसगांवकर, व्यावसायिक.

शहरातील प्रमुख रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना आडमार्गाने जावे लागते. मात्र, गल्ल्यांमध्ये वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. या रस्त्यांवरून गाडी चालवल्यामुळे पाठ व मणक्‍यांच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याची कामे जलदगतीने पूर्ण करावी. 
- आशीष कपले, अमरावती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati people facing problems due to dangerous road