आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन, अमरावतीपासून यवतमाळपर्यंत नेटवर्क

संतोष ताकपिरे
Sunday, 11 October 2020

आयपीएल सट्ट्यामध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर केला गेला. याप्रकरणात जुगार कायद्यासोबतच बुकींविरुद्ध फसवणूक व विश्वासघातासह टेलिग्राम कायदा सहकलमचे उल्लंघन केल्याचाही आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे घटनेतील गांभीर्य वाढले.

अमरावती : यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सटोडियांचे अमरावतीत नेटवर्क आढळल्यानंतर तपासात मुख्य बुकी हे नागपूरचे असल्याचे निष्पन्न झाले. अमरावती गुन्हेशाखेने त्या बुकींना शनिवारी (ता. दहा) रात्री नागपूरच्या जरीपटका भागातून अटक केली.

हेही वाचा - मारुती चितमपल्लींनी आत्मकथनाला 'चकवा चांदण'च नाव का दिले?

सुमित शंकर नागवानी (वय ३२) व रॉकी रमेशलाल अलवानी (वय ३९, दोघेही रा. जरीपटका नागपूर), अशी अटक बुकींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यवतमाळ, अकोला येथील सटोडियांनी अकोली मार्गावर एका फ्लॅटमध्ये ठाण मांडल्यानंतर ती पुढची आकडेमोड नागपूरच्या या दोन मुख्य बुकींपर्यंत पोहोचवित होते, असे गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी पोलिसांनी अमरावतीच्या साईनगर जवळच्या विश्रामनगरात एका फ्लॅटमालकासह चौघांना गुरुवारी (ता. आठ) रात्री पकडले होते. त्यात रमेश सुगनचंद कटारिया (वय ४१, वैद्यनगर, यवतमाळ), आकाश राजू वीरखेडे (वय २४, एकतानगर, यवतमाळ), अविनाश विजयकुमार प्रेमचंदाणी (वय ४६, रा. qसधीकॅम्प, यवतमाळ), राजकुमार गेही (वय ४०, सिंधीकॅम्प, अकोला) आदींचा समावेश होता. सुरेश महादेव अवघड अद्याप फरार आहे, असे गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी स्पष्ट केले. अटकेतील चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी (ता.११)संपल्यामुळे त्या चार सटोडियांसह नागपूर येथील मुख्य बुकी सुमित व रॉकी या दोघांना विशेष न्यायालयापुढे हजर केले. चौघांना न्यायालयीन कोठडी, तर नागपूरच्या मुख्य बुकींना मंगळवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

हेही वाचा - अखेर जमलं भाऊ! तिसऱ्या दिवशी नागपूर विद्यापीठाच्या...

गुन्ह्यातील गांभीर्य वाढले -
आयपीएल सट्ट्यामध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर केला गेला. याप्रकरणात जुगार कायद्यासोबतच बुकींविरुद्ध फसवणूक व विश्वासघातासह टेलिग्राम कायदा सहकलमचे उल्लंघन केल्याचाही आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे घटनेतील गांभीर्य वाढले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati police arrested main bokkie from nagpur in IPL betting