Amravati : ३१ मुलांचे भविष्य केले समृद्ध

प्रज्ञा प्रबोधिनीने दत्तक घेऊन केले संगोपन; पारधी बेड्यावर होतोय कायापालट
Amravati Pragya Prabodhini Adopted 31 children
Amravati Pragya Prabodhini Adopted 31 children

अमरावती : आजही भटकंती करणाऱ्या पारधी समाजावर वेगळाच ठपका ठेवला जातो. मात्र, याच पारधी बेड्यावरील मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण व संगोपन करण्याचे कार्य अमरावती येथील प्रज्ञा प्रबोधिनीच्या माध्यमातून पिंकी नरेंद्र भोसले या मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. एक, दोन नव्हे, तर तब्बल ३१ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या समृद्ध आयुष्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

भटक्या समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी २००३ पासून अमरावती येथील प्रज्ञा प्रबोधिनी ही संस्था काम करीत आहे. पारधी बेड्यावरील लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतानाच मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचे कार्य या माध्यमातून केले जाते. याच कार्यात पिंकी भोसले यांनी बेड्यावरील ३१ मुलांच्या निवासाची तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्या पोटच्या मुलांप्रमाणे विद्यार्थ्यांचा सांभाळ करीत आहेत.

ही मुले आता संस्कृती, व्यायाम, योगाभ्यासाचे धडे गिरवायला लागली आहेत. विशेष म्हणजे, आपल्या कुटुंबाशी संवाद साधता यावा याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी बेड्यावर आरोग्यरक्षक व बचतगटप्रमुखांची नियुक्तीसुद्धा करण्यात आलेली आहे. प्रज्ञा प्रबोधिनीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांचा सांभाळ करणारी आई पिंकी भोसले यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

पिंकी व नरेंद्र भोसले दाम्पत्याच्या सहकार्याने आम्ही ३१ मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देऊ शकलो. त्यामुळे समाजात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करू शकलो. हीच प्रज्ञा प्रबोधिनीची फलश्रुती आहे.

-अविनाश देशपांडे, अध्यक्ष, प्रज्ञा प्रबोधिनी संस्था.

प्रज्ञा प्रबोधिनीच्या पुढाकारातून आम्ही बेड्यावरील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. केवळ शिक्षणच नव्हे, तर त्यांच्यावर योग्य संस्कार करून योगाभ्यासाचे धडेही गिरवायला लावलेत. हीच आमच्या कामाची पावती आहे.

-पिंकी भोसले, कार्यकर्त्या, प्रज्ञा प्रबोधिनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com