आम्हाला गद्दार संबोधणारे स्वतःच गद्दार; संदीपान भुमरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati Shinde group meeting

आम्हाला गद्दार संबोधणारे स्वतःच गद्दार; संदीपान भुमरे

अमरावती : महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून जनतेशी गद्दारी केली, त्यामुळे आम्ही केलेल्या उठावाला त्यांनी गद्दारी संबोधू नये, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आज (ता.२४) येथे केले.

स्थानिक गुरुदेव मंगल कार्यालयात शनिवारी हिंदू गर्व गर्जना संपर्कयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानिमित्त शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, जिपचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख करुणा इंगोले, पुरूषोत्तम बनसोड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्य शिवसैनिकच काय तर शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांना सुद्धा भेटत नव्हते. विकास कामांच्या फाइल्स पेन्डिंग ठेवत होते, त्यांच्या विरोधातील रोष एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या माध्यमातून बाहेर आला. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्वांनाच आपल्या घराची दारे उघडी करीत सुटले आहेत, मात्र ज्यावेळी शिवसैनिकांना, सामान्य जनतेला त्यांची गरज होती त्यावेळी ते नेहमीच गायब राहत होते.

आम्ही सुद्धा त्यांना टीव्हीवरच पाहत होते, असेही संदीपान भुमरे म्हणाले. राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर विकास कामे गतीमान झाली असून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे आता सिद्ध होत आहे, असे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. मेळाव्याचे संचालन व आभार प्रदर्शन शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील केने यांनी केले.