Amravati
Amravati

Amravati : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा

मतदानादरम्यान दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते आमने-सामने

अमरावती : विदर्भातील सर्वांत मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीदरम्यान आज राडा झाला. याप्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोन कार्यकर्त्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात (बीपीएड) मतदान केंद्र असून मतदानाच्या वेळी सकाळपासूनच दोन्ही प्रमुख पॅनेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पंचवटी चौकाच्या जवळ गोळा झाले होते. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार व विक्रम ठाकरे यांच्यात बाचाबाची झाली. मतदानकेंद्राच्या आतमध्ये असताना भुयार यांनी बिल्ला न लावण्यावरून विक्रम ठाकरे यांनी आक्षेप घेतल्याने शाब्दिक वाद झाला. हा वाद बघून दोन्ही पॅनेलच्या काही कार्यकर्त्यांमध्ये केंद्राबाहेर जुंपली.

जवळपास वीस पंचवीस कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेलेत. त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. वाद घालणाऱ्या कार्यकर्त्यांना केंद्रापासून दूर केले. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गाडगेनगर पोलिसांनी बंदोबस्त कडक केला आहे. मतदानकेंद्रासमोर जमण्यास मनाई केली आहे. आमदार भुयार प्रगती पॅनेलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत, तर विक्रम ठाकरे हे विकास पॅनेलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार नरेशचंद्र ठाकरे यांचे प्रतिनिधी आहेत.

यापूर्वी हर्षवर्धन देशमुख यांना रवींद्र गायगोले यांनी धक्का दिल्याचा आरोप आहे. त्यावरून हेमंत काळमेघ यांनी आक्षेप घेतला. दरम्यान भुयार व ठाकरे यांच्यातही वाद झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे या परिसरात आता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेसाठी मावळते अध्यक्ष हर्षवर्धन देशमुखप्रणीत प्रगती व उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्या विकास पॅनेलकडून एकास एक उमेदवार उभे ठाकल्याने ही लढत रंगतदार होत आहे. सायंकाळपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा निकाल उशिरा रात्री लागण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com