अमरावती हिंसाचार : पोलिसांनी भाजपच्या माजी मंत्र्याला केले स्थानबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amravati violence

अमरावती हिंसाचार : पोलिसांनी भाजपच्या माजी मंत्र्याला केले स्थानबद्ध

अमरावती : शहर बंदला हिंसक (amravati violence) वळण लागल्यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद असून आज अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी भाजपच्या माजी मंत्र्याला (BJP Leader) शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध केल्याची माहिती आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा तीन दिवस बंदच

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर शहराच्या काही भागांत दगडफेक झाली. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजपने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला. राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनाच्यां पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून निदर्शने केली. शहरातील नमुना परिसर, जवाहर गेट, गांधी चौक भागामध्ये फिरून किरकोळ स्वरूपात फुटपाथवर असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. या बंदला हिंसक वळण लागल्याने अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

माजी मंत्र्याला का केले स्थानबद्ध? -

भाजपचे नेते तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना अमरावती पोलिसांनी शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध केले आहे. भाजपने काल रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला. यामध्ये अनिल बोंडे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ''आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत'', असा आरोप करत घटनेचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे बोंडेंना स्थानबद्ध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

loading image
go to top